पान:इहवादी शासन.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । २१
 



 कोणत्या शासनाला इहवादी शासन म्हणावें याची थोडी चर्चा आपण यापूर्वी केली आहे. समाजाचें कल्याण कशांत आहे याचा तर्कशुद्ध, शास्त्रीय, ऐतिहासिक पद्धतीने विचार करून तें कल्याण साधेल असे कायदे करणारे शासन इहवादी शासन असें त्या चर्चेवरून आपणांस म्हणतां येईल. धर्माचें वर्चस्व इहवादी शासन मानीत नाही याचेंहि कारण हेंच आहे. बहुधा सर्व धर्म शब्दप्रामाण्यवादी, परलोकवादी, देशकाल न पाहणारे परिवर्तनविरोधी असे असतात. त्यामुळे त्यांचें वर्चस्व शासनावर असलें की, तर्क, इतिहास, प्रत्यक्ष प्रयोग यांवरून सिद्ध होणारी समाजाच्या उत्कर्षापकर्षाची मीमांसा त्याला स्वीकारतां येत नाही. आणि मग प्रगतीशील कायदे करतां येत नाहीत. पाश्चात्य शासनांना इहवादी होण्याची आवश्यकता पांच-सहा शतकांपूर्वी भासूं लागली त्याचें कारण हें आहे. आजहि सेक्युलॅरिझमचा सर्वत्र स्वीकार होत आहे त्याचें कारण हेंच आहे. (आपापल्या समाजाच्या प्रगतीचा मार्ग आखतांना लोकांना त्या मार्गांत अडथळा आणणारी धर्मबंधनें नको आहेत.)
 सोव्हिएट शासनाने आपण इहवादी असल्याचें घोषित केलें तें त्यासाठीच. रशियांतील धर्मसंस्थांविषयी नवे कायदे करतांना त्याने इहवादाला कोणतें रूप दिलें तें आपण पूर्वी पाहिलेंच आहे. आता तेथील कुटुंबसंस्थेचा या दृष्टीने विचार करावयाचा आहे. समाजवादी व्यवस्थेत धर्माला स्थान असूच शकत नाही, या भूमिकेसारखीच कुटुंबसंस्थेबद्दलहि कम्युनिस्टांची प्रारंभी भूमिका होती. अशी भूमिका असण्याचें मुख्य कारण हे की, जुन्या कुटुंबव्यवस्थेत स्त्री ही गुलाम होती. कुटुंबांतील या स्त्रीच्या दास्यामुळे निम्मा समाज शृंखलाबद्ध होऊन बसतो व समाजवादी उत्पादनाला त्या प्रचंड शक्तीचें साह्य लाभू शकत नाही, हें कारण लेनिन नेहमी सांगत असे. कुटुंबसंस्थेचा कम्युनिस्टांना द्वेष वाटण्याचें दुसरें कारण असें की, जुना अंध धर्म, जुन्या परंपरा, जीर्णमतवाद, अंधश्रद्धा, घातक रूढि यांचा कुटुंबसंस्था हा मोठा आधार असतो. सोव्हिएट नेत्यांना कम्युनिस्ट मानव निर्माण करावयाचा होता. बालवयांत हा मानव जर या संस्कारांत वाढला तर त्याची मानसिक क्रांति करणें जवळ जवळ अशक्य होऊन बसतें. म्हणून बालपणापासूनच मुलांना घरापासून, आई-बापांपासून व त्या जुनाट अंधश्रद्ध वातावरणांतून दूर नेणें अवश्य होतें. कुटुंबसंस्थेवर त्यांना आघात करावयाचा होता तो यासाठी. प्लेटोच्या काळापासून कुटुंबसंस्था ही समाज विकासाच्या आड येते असें एक मत रूढ होतें. कौटुंबिक संस्कारांमुळे मनुष्याची दृष्टि बहीण, भाऊ, आई, बाप आणि आपली मुलेबाळें यांच्यापुरतीच मर्यादित राहते. त्यांच्या कल्याणाचीच फक्त जबाबदारी आपल्यावर आहे अशी त्याची भावना होते. ती संस्था नष्ट केली, तर त्याची दृष्टि समाजांतील सर्व