पान:इहवादी शासन.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२० । इहवादी शासन
 

काय अधिकार आहे ? रशियांत असेच अत्याचार चालू आहेत. आणि हेहि कॉम्युनिस्ट या पत्रावरूनच दिसून येते. एकीकडे रशियांतील धर्मस्वातंत्र्याचा गौरव व चीनमधील अत्याचारांचा निषेध चालू असतांनाच "आमच्या निरीश्वर पंथीयांनी इस्लामचें वर्गीय रूप लोकांना उघड करून दाखविलें पाहिजे; सत्ताधारी वर्गाचे कप्कटरी जनतेला शोषणाचे इस्लाम हें कसें साधन होतें तें इतिहासाच्या आधारें स्पष्ट केलें पाहिजे; आणि मुस्लिम मुल्ला-मौलवींचा, कम्युनिझम व इस्लाम यांत भेद नाही, हा ढोंगी फसवा प्रचार हाणून पाडला पाहिजे. असा उपदेश तेंच पत्र करीत होते."
 जे रशियन ऑर्थोडॉक्स चर्चेच्या धर्माविषयी म्हटले तेंच इस्लामविषयी म्हणावेंसें वाटतें. त्या समाजाची धर्मभावना समूळ नष्ट करणें कालत्रयी शक्य नाही हें प्रारंभापासूनच कम्युनिस्टांनी जाणलें असतें व भौतिक विज्ञानवादी दृष्टिकोनांतून त्या धर्माची सुधारणा करण्याचें धोरण केमालपाशासारखें आखलें असतें तर आतापेक्षा मुस्लिम समाजाची कम्युनिझमच्या दृष्टीने सुद्धा जास्त प्रगति झाली असती. कारण, इस्लाममध्ये कम्युनिझमचींच तत्त्वें आहेत, असें सांगणारा एक फार मोठा वर्ग रशियन तुर्किस्तानांत लवकरच निर्माण झाला होता. पण कम्युनिस्ट अजूनहि धर्माकडे त्या दृष्टीने पाहण्यास तयार नाहीत. त्यामुळे रशियांत अंतर्गत धोरण एक व परराष्ट्रांसाठी दुसरें असा ढोंगीपणा, दुटप्पीपणा त्यांना करावा लागत आहे. आणि तो अगदी विनाकारण. राजनीतींत हें सर्व करावें लागतें. पण तसें करण्याचें येथे कांहीच कारण नव्हतें- पण नव्हतें असें कसें म्हणावें ? "डायलेक्टिकल मटीरियालिझम" हें मोठें कारण आहे ना ! तो भ्रांत सिद्धान्त सोडावयास अजूनहि ते तयार नाहीत. कारण तो सोडावयाचा म्हणजे आत्माच सोडावयाचा अशी कम्युनिस्टांची श्रद्धा आहे. वास्तविक मूळ तत्त्वांचा वाटेल तो अर्थ फिरविण्यांत कम्युनिस्ट अत्यंत निष्णात आहेत. तसा विरोधविकासवादाचा अर्थ फिरवून धर्मतत्त्वांचा त्यांत त्यांना समावेश करतां आला असता, नवीन भाष्य लिहितां आलें असतें. तशा भाष्यांवरच जग चाललें आहे. सोव्हिएट रशियाचा प्रपंचहि मूळ मार्क्सवादावर चाललेला नसून त्याच्या भाष्यावरच चाललेला आहे. कुटुंबसंस्थेच्या बाबतीत त्यांनी अशा भाष्याचाच अवलंब करून चांगले यश संपादन केलें आहे. कडव्या मार्क्सनिष्ठ इहवादांतच त्यांनी सनातन कुटुंबसंस्था- मातृत्व, पातिव्रत्य, अपत्यप्रेम, अष्टपुत्रा यांसह- बसविली आहे. येथे एवढेच सांगावयाचें आहे की, हें भाष्यरूपाने सुधारणा करण्याचें धोरण इस्लामविषयी त्यांनीं स्वीकारलें असतें तर रक्तपात, प्राणहानि हें सर्व वांचलें असतें. पण मग कदाचित् त्यांत प्रौढी मिरवण्याजोगें कांही झालें नसतें. औरंगजेब म्हणत असे की, "लक्षवधि माणसे मरतात तेव्हाच तैमूरसारखी कीर्ति मिळते." डायलेक्टिकल भौतिकवादाचा हाच संदेश आहे.