पान:इहवादी शासन.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३१० । इहवादी शासन
 

होणार नाही. त्याला स्वातंत्र्य मिळणार नाही व मिळाले तरी तें टिकणार नाही, या त्यांनी शतवार सांगितलेल्या सत्याची आज पावलोपावली प्रचीती येत आहे.
 "हिंदु धर्माच्या आणि हिंदुराष्ट्राच्या मुळासच लागलेली ही जन्मजात म्हणविणाऱ्या, पण पोथीजातच असणाऱ्या, जातिभेदाची कीड मारल्यावांचून तो संघटित व सबळ होऊन आजच्या जीवनकलहांत टिकाव धरूं शकणार नाही," असा घोष ऊर्ध्वबाहू होऊन ते सारखा करीत होते. असाच घोष अस्पृश्यतेबद्दलहि जन्मभर त्यांनी चालविला होता. "अस्पृश्यता ही तर निव्वळ मानीव, पोथीजात. माणुसकीचा कलंक! ती तर तात्काळ नष्ट केली पाहिजे. या एका सुधारणेसरशी कोटि कोटि हिंदुबांधव आपल्या राष्ट्रांत एकजीव होऊन सामावले जातील व हिंदु राष्ट्रासाठी झुंजूं लागतील." चातुर्वर्ण्याला संकराची फार भीति वाटते. 'संकरो नरकायैव' हें वचन प्रसिद्धच आहे. पण यासंबंधी विवेचन करतांना वर्णसंकरांतून निर्माण झालेल्या वेदव्यासांसारख्या महापुरुषांची उदाहरणे देऊन 'संकरः स्वर्गायैव' असा सिद्धान्त सावरकरांनी मांडला आहे.

बेड्या तोडून टाका

 वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या सात बेड्यांनी हिंदु समाजाची सर्व हानि झाली आहे, असें सावरकरांचें मत आहे. त्या बेड्या तोडून टाका असें सांगताना त्यांनी जें विवेचन केले आहे त्यांत हिंदुराष्ट्राच्या घडणीसाठी अवश्य असलेली सामाजिक क्रान्ति, धार्मिक क्रान्ति व इहवाद यांची सर्व तत्त्वें आलेली आहेत. या सर्व बेड्या हिंदंनी आपण होऊनच आपल्या पायांत ठोकून घेतल्या आहेत. म्हणजे त्या श्रुतिस्मृतिपुराणोक्त हिंदुधर्मशास्त्राने हिंदु समाजाच्या पायांत ठोकल्या आहेत. त्या बेड्या म्हणजेच तें धर्मशास्त्र त्याज्य मानले पाहिजे असें सावरकर सांगत होते. इहवाद तरी दुसरें काय सांगतो? माझीं श्रवणेंद्रियें आणि माझी आकलन शक्ति ही ह्या ऐहिक, प्रत्यक्ष प्रमाणमय जगाचा शब्दघोष ऐकण्यास शिकली आहे, असें त्यांनी पुनः पुन्हा सांगितले आहे.
 सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद हा अनेकांच्या डोळ्यांत सलतो. पण मुस्लिमांची विभक्तवृत्ति व मुस्लिम साम्राज्याच्या पुनरुज्जीवनाची त्यांची आकांक्षा यामुळेच तो निर्माण झाला आहे. आणि दुसरें म्हणजे हिंदुत्वाची अत्यंत व्यापक व्याख्या करून आजच्या भारतीय राष्ट्रवादाचा आशय त्यांनी त्यांत भरला आहे. भारतभूमि ज्यांची पितृभू व पुण्यभू आहे तो हिंदु अशी त्यांनी व्याख्या केली आहे. वेदप्रामाण्य हें व्याख्येतून रद्द केल्यामुळे बौद्ध, जैन, शीख यांचा समावेश हिंदुत्वामध्ये होतो. आणि याच्यापुढे जाऊन हिंदुत्वाच्या धार्मिक लक्षणाला गौणत्व देऊन "धर्मांतर केल्यावरहि मनुष्य संस्कृतीने हिंदु राहूं शकतो" असे सांगून भारतीयत्वाइतका त्यांनी हिंदुत्वाला व्यापक अर्थ दिला आहे.