पान:इहवादी शासन.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पृथ्वीप्रदक्षिणा । ३११
 

 राजकुमारी अमृतकौर, तेलो मस्कारेन्हस यांनी याच अर्थाने आपण हिंदु आहों असें म्हटल्याचें मागे सांगितलेच आहे. अल्पसंख्याकांविषयीचा आपला दृष्टिकोन स्पष्ट करतांना आमचे "पारशी नि ख्रिश्चन देशबंधु हे आजच सांस्कृतिकदृष्ट्या आमच्याशी समानशील आहेत, समंजस आहेत व देशभक्त आहेत" असें निःसंदिग्धपणें सावरकरांनी म्हटलें आहे. हिंदुत्वाची अशी सांस्कृतिक पायावर उभारणी केल्यामुळे ते भारतीयत्वाशी समव्याप्त होतें हें कोणालाहि सहज मान्य होईल.
 जातिभेद असो, अस्पृश्यता असो, परदेशगमन असो, पतितशुद्धि असो, देवपूजा असो, गोपूजा असो, स्मृतींतलें वचन असो, श्रुतींतलें असो, कुराणांतलें असो, बायबलांतलें असो, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आचार, रूढि, वचन, तत्त्व हें उपयुक्ततेच्या विज्ञानाच्या, बुद्धीच्या प्रत्यक्षनिष्ठ, निकषावर घासून पाहूनच तें ग्राह्य की त्याज्य तें ठरवावें हा विचार सावरकर जन्मभर सांगत व आचरीत राहिले.
 यावरून हे ध्यानांत येईल की गेल्या शंभर-दीडशे वर्षांत होऊन गेलेल्या भारतीय नेत्यांमध्ये इहवादाचे ते सर्वश्रेष्ठ पुरस्कर्ते होते, त्यांच्यांतले ते मुकुटमणि होते. असें असल्यामुळे त्यांच्या शब्दांतच इहवादाच्या विवेचनाचा समारोप करणें मला सर्वथैव योग्य वाटलें. त्या महापुरुषाच्या पुण्याईमुळे तरी भारतीय समाजांत इहवादाचीं मूलतत्त्वें दृढमूल व्हावीं व राष्ट्रवाद, लोकशाही आणि समाजवाद या तत्त्वांवर भारत राष्ट्राची पुनर्घटना करण्यांत भारतीयांना यश यावे अशी शुभेच्छा व्यक्त करून हें विवेचन संपवितों.