पान:इहवादी शासन.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पृथ्वीप्रदक्षिणा । ३०९
 

नेता, सर्व बुद्धिमंतांचा अग्रणी, हाडाचा क्रांतिकारक असा एक टोलेजंग पुरुष हिंदु समाजाला नेता म्हणून लाभला होता. पण त्याच्या राजकीय कार्यासाठी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळून त्याच्या सामाजिक व धार्मिक क्रांतीच्या विचारांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचेंच धोरण हिंदु समाजाने अवलंबिलें होतें व अजूनहि आहे. सावरकरांच्या तत्त्वज्ञानाविषयी हिंदु समाजाची व त्याच्या तथाकथित नेत्यांची ही उपेक्षावृत्ति जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत हा समाज इहवादी होणें अशक्य आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत तो इहवादी होत नाही तोपर्यंत तो संघटित होणें शक्य नाही व त्याच्या ठायीं बल व सामर्थ्य येणेंहि शक्य नाही. म्हणून सावरकरांनी जें धार्मिक व सामाजिक क्रांतीचें तत्त्वज्ञान सांगितले त्याचा अभ्यास व्हायला हवा.
 हिंदुधर्म, हिंदु संस्कृति व हिंदूंची प्राचीन परंपरा यांचे सावरकर पराकाष्ठेचे अभिमानी होते. हा अभिमान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मौलीभूत घटक होता. "हिंदु विचारपरंपरा इतकी पूर्णपदाला पोचली आहे की, तत् आणि त्वम् याबद्दल तिच्या पलीकडे कोणी जाऊं शकणार नाही. कांही झाले तरी बुद्धिवादाच्या दृष्टिीनेहि एकंदरींत पाहतां सर्व धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदु धर्म होय' या त्यांच्या वचनांवरून हें स्पष्ट होईल. पण त्यांचा अभिमान विषय असलेल्या हिंदु धर्माचें त्यांच्या मतें स्वरूप काय होतें ? विज्ञानपूत, बुद्धिप्रामाण्यवादी, असा हिंदु धर्म त्यांना अभिप्रेत होता. "धारणात् धर्मं इत्याहु:" ही धर्माची व्याख्या त्यांना मान्य होती. हिंदु समाजाचे संघटन करील, रक्षण करील तो धर्म, असे त्यांनी वारंवार म्हटलें आहे. धर्मग्रंथांत सांगितला असेल तो धर्म असें ते कधीच मानीत नाहीत.
 "धर्मग्रंथ हे ईश्वरी आज्ञा नसून मनुष्यकृतच आहेत. म्हणून ते त्रिकालज्ञानी त्रिकालाबाधित होऊं शकत नाहीत. त्यांना आदरावे पण अनुल्लंधनीय शास्त्र कधीच मानूं नये. मागासलेल्या धर्मग्रंथांना त्रिकालाबाधित मानल्यामुळेच हिंदु समाज मागासलेला राहिला" असें ते नेहमी म्हणत. धर्म विज्ञानपूत असावा असें सांगतांना अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन, "कार्यकारण भावाच्या कसोटीला उतरणारे व मनुष्याच्या ज्ञानाच्या आटोक्यांत येणारे जे सृष्टिनियम व जीं वैज्ञानिक सत्यें त्यांसच आम्ही आमचा सनातन धर्म समजतो" असें त्यांनी निकराने सांगितलें आहे. भावार्थ असा की, सावरकरांचा हिंदु धर्म हा पोथीबद्ध, श्रुतिस्मृतिबद्ध नसून हिंदु राष्ट्राच्या अभ्युदयार्थ जो जो विधिनिषेध, जो आचार, जें तत्त्व उपकारक तो हिंदु धर्म, अशी त्यांची व्याख्या आहे. त्यांच्या मतें हिंदुसंघटन हेंच स्मृतिशास्त्र होय आणि हिंदुराष्ट्राच्या संघटनाबलाच्या मुळावर घाव घालणारा जो धर्म तो धर्म नसून अपधर्म होय.
 चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, यांवर याच प्रखर बुद्धिवादी दृष्टींतून त्यांनी कठोर प्रहार केले आहेत. या घातक रूढि आहेत तोपर्यंत हिंदु समाज संघटित