पान:इहवादी शासन.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०८ । इहवादी शासन
 

होतें. त्यांनाहि स्वार्थ सुटला नव्हता. आपापले पक्षीय नेतेपद टिकवून धरण्यासाठी त्यांनीहि धर्मांधता, असहिष्णुता, जातिभेद, वर्णभेद, शब्दप्रामाण्य, कर्मकांड या व्याधींची जपणूक केली. समाजवादी, साम्यवादी पक्षांची ही मोठी जबाबदारी होती. पण त्यांनी कामगारांतहि सामाजिक आणि धार्मिक क्रांति केली नाही, तसे प्रयत्नहि केले नाहीत. जीर्णमतवादाचा त्यांनी परिपोषच केला. त्यामुळे भारताची जनता अजूनहि इहवादापासून फार दूर आहे आणि दिवसेदिवस ती जास्त जास्तच दूर जात आहे असें दिसतें.

नव्या नेतृत्वाची गरज

 अशा स्थितींत या जीर्णमतवादी पुराण्या नेतृत्वाला विटलेले, त्याचा उबग आलेले जे विद्यासंपन्न मध्यमवर्गीय तरुण त्यांनी नवें नेतृत्व निर्माण करून समाजावर इहवादाचे संस्कार करण्याची म्हणजे सामाजिक व धार्मिक क्रांति करण्याची जबाबदारी शिरावर घेतली पाहिजे. कारण अंती समाज इहवादी झाल्यावांचून या देशांत कसलीहि प्रगति होणें शक्य नाही. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, यांवरची श्रद्धा ढळल्यावांचून व्यक्ति निर्माण होणार नाहीत; व्यक्ति नाहीत म्हणजे राष्ट्र नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, यांवांचून लोकशाही नाही. जनता सार्वभौम होऊं शकणार नाही. तिच्या ठायीं संघटित सामर्थ्य निर्माण होणार नाही. ती अशी दुबळी आहे, तोपर्यंत शासन हें भ्रष्ट, सत्तालोभी, जुलमी, अन्यायी व भोगैकपरायण असेंच राहणार.
 असें शासन समाजवाद कधीच आणूं शकणार नाही. तेव्हा निःस्पृह, सत्ताविमुख, लोकवादी, बुद्धिवादी, असें नेतृत्व निर्माण झालें व त्याने इहवादाचा अवलंब करून सामाजिक व धार्मिक क्रांति घडवून आणली तरच भारताचें स्वातंत्र्य टिकेल व त्याची प्रगति होईल.
 अशी क्रांति घडविण्याची जबाबदारी सर्व भारतीय समाजावर व विशेषतः हिंदु समाजावर आहे. कारण हाच समाज बहुसंख्य आहे. आणि भारताचें भवितव्य घडविणें हें बव्हंशी त्याच्यावरच अवलंबून आहे. पण मागे एक-दोनदा सांगितल्याप्रमाणे त्या दृष्टीने इतरांच्या तुलनेने त्याने जरी बरीच प्रगति केली असली, तरी लोकशाही, समाजवाद, राष्ट्रनिष्ठा, ही तत्त्वें यशस्वी करण्याइतकी इहवादी दृष्टि बहुजनसमाजाला व बऱ्याचशा सुशिक्षितांनाहि अजून प्राप्त झालेली नाही. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, घातक धार्मिक रूढि, देवलसी वृत्ति यांची बीजें त्यांच्या मनांतून समूळ नष्ट झालेली नाहीत.

सावरकरांचे तत्त्वज्ञान

 हिंदुराष्ट्र, हिंदुत्व यांचा नित्य घोष करणारे हिंदु नेते, त्यांचें अजून समर्थनच करतांना दिसतात. वास्तविक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यासारखा, सर्व नेत्यांचा