पान:इहवादी शासन.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पृथ्वीप्रदक्षिणा । ३०७
 

वस्त्र, घर, शिक्षण व आरोग्य हें हक्काने मिळाले पाहिजे हें समाजवादाचें अंतिम उद्दिष्ट आहे. तें साध्य व्हावयाचें तर आजच्या सहस्र पटींनी, लक्ष पटींनी उत्पादन वाढलें पाहिजे. ही वाढ विज्ञानोपासनेवांचून अशक्य आहे. आणि विज्ञानोपासना ही बुद्धिप्रामाण्य, स्वतंत्र चिंतन, सत्याचें निर्भय प्रतिपादन यांच्या आश्रयावांचून शून्यवत् होते. तेव्हा इहवादावांचून समाजवादी समाजरचनेच्या दृष्टीने एक पाऊलहि टाकता येणार नाही, हे उघड आहे.
 तेव्हा राष्ट्रनिष्ठा, लोकशाही व समाजवाद हीं जीं आजचीं युगतत्त्वें तीं इहवादाच्या अवलंबनांवाचून प्रत्यक्षांत येणें कदापि शक्य नाही.
 ती प्रत्यक्षांत आणण्यासाठी इहवादी शासनाची आवश्यकता असते. अप्रगत देशांत तर अशा शासनावांचून कसलीच प्रगति होणार नाही. कारण विषमता, दारिद्र्य, अज्ञान, जातिभेद, धर्मभेद, वर्णभेद, स्त्री-पुरुषविषमता, अंध धर्मसत्ता, कर्मकांड, शब्दप्रामाण्य, सुस्त, निरुद्योगी लोक, भयग्रस्त, प्रतिकारशून्य जनता हीच अप्रगत देशाचीं लक्षणें होत. यामुळेच समाज अप्रगत राहिलेला असतो, त्याची प्रगति खुंटलेली असते. तेव्हा या सर्व व्याधींपासून त्याला मुक्त करण्याची जबाबदारी शासनावरच प्राधान्याने येते.
 भारतांत घटनेने शासन पूर्णपणे इहवादी करून टाकलें आहे, पण सत्तालोभ, स्वार्थ, ध्येयशून्यता यांमुळे काँग्रेसच्या शासनाने वर निर्देशिलेले समाजाचे सर्व रोग त्या सर्व व्याधी, तशाच जपून ठेवण्याचें धोरण अवलंबिले आणि केव्हा केव्हा तर त्या वाढवून ठेवल्या. त्यामुळे राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद या नुसत्या घोषणाच राहिल्या आणि स्वातंत्र्यानंतर जी प्रगति, जो समाजविकास अपेक्षित होता तो झाला नाही. इतकेंच नव्हे तर उज्ज्वल भवितव्याची आशाहि लोकांच्या मनांतून नष्ट होत चालली आहे. भारताचें शासन खरेखुरें इहवादी असतें, घटनेंतील तत्त्वें त्याने प्रामाणिकपणें प्रत्यक्षांत आणली असती तर हा अनर्थ ओढवला नसता.
 पण जसे लोक तसें त्यांचे शासन हेंहि खरेंच आहे. शासनाने लोकांना वळण लावलें पाहिजे हें जितकें खरें तितकेंच लोकांनी शासनाला वळण लावलें पाहिजे, हेंहि खरें आहे. लोकशाहीत जनता सार्वभौम असते याचा दुसरा अर्थ काय आहे ? अप्रगत देशांत लोकांवर इहवादाचे संस्कार करणें हें शासनाचें जसें कर्तव्य आहे तसेंच लोकनेत्यांचेंहि आहे. पण त्या दृष्टीनेहि भारत दुर्दैवीच ठरला. ब्रिटिशांचें राज्य असतांना राममोहन रॉय, रानडे, टिळक, सावरकर, महात्माजी, पंडितजी, नेताजी असे जंगी लोकनेते भारताला लाभले होते व त्यांनीच येथे त्या समाजाला आधुनिक युगांत खेचून आणलें होतें.
 स्वातंत्र्यानंतर भारताचे शास्ते तर कर्तव्यच्युत झालेच, पण विरोधी पक्षांचे नेतेहि तसेच, किंबहुना त्याहूनहि जास्तच हीन पातळीवर गेले. त्यांचेंहि लक्ष सत्तेवरच