पान:इहवादी शासन.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । १९
 

मुस्लिमांची मागासलेले, अंधश्रद्ध अशी हेटाळणी करीत होते. यावरून सोव्हिएट मुस्लिमांच्या ठायीं ही श्रेष्ठतेची अहंभावना निर्माण करण्यांत सोव्हिएट शासनाला यश आलें असावें असें दिसतें. (करंट हिस्टरी, जून १९५७ पृ. ३५५-५६).
 चीन आणि रशिया यांचे आज वैमनस्य असलें तरी धर्माचा उच्छेद करण्याविषयी त्यांच्या धोरणांत मुळीच फरक नाही. १९६६ साली रेडगार्ड संघटनेचा उठाव झाला होता तेव्हा इस्लामवर भयानक अत्याचार करण्यांत आले. रेडगार्डस् यांनी 'इस्लामचा नाश करणारें क्रांतिमंडळ' नांवाचें एक मंडळच स्थापन केलें होतें. त्या मंडळाने 'मशिदी बंद करा, कुराणपठन बंद करा, धार्मिक विवाह बंद करा' अशी भित्तीपत्रके लावली व मुस्लिमांचे सर्व आचार, रूढि, धर्मविधि ताबडतोब नष्ट करणें हें आपले उद्दिष्ट असल्याच्या घोषणा चालू केल्या. पेकिंगमध्ये जवळ जवळ एक लक्ष मुस्लिम नागरिक आहेत. १९६७ सालीं रेडगार्डस् चा मोहरा त्यांच्याकडे फिरला. आणि त्यांनी मशिदींचा विध्वंस केला, व मुस्लिम धार्मिक आचारांची विटंबना केली. या काळांत मारामाऱ्या, रक्तपात, अत्याचार, खून यांना ऊत आला होता.

राक्षसी अत्याचार

 चीनमध्ये बौद्धधर्मीयांची संख्या फार मोठी आहे. पण त्यांची स्थिति तशी कांही निराळी नाही. धर्म या कल्पनेचेच कम्यनिस्ट हे वैरी असल्यामुळे मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध असा भेदाभेद ते करीत नाहीत. तिबेट चीनच्या हातीं आल्यानंतर कम्युनिस्टांनी तेथे जे राक्षसी अत्याचार केले त्यांचें वर्णन "इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्टस्" या मंडळाने आपल्या अहवालांत केलें आहे. त्यावरून कम्युनिस्टांच्या धर्मद्वेषाची व इहवादाची चांगली कल्पना येते. अनेक लामांची त्यांनी विटंबना केली, शेकडो लामांचा शिरच्छेद केला आणि त्यांचे बहुतेक सर्व मठ उद्ध्वस्त करून टाकले. आणि दर वेळीं "तुमच्या धर्माला, तुमच्या देवाला, आता हाका मारा, म्हणजे तो तुमचें रक्षण करील" अशा डागण्या ते देत असत.
 चीनचें व रशियाचें आज वाकडें आहे. त्यामुळे प्रवदा, कॉम्युनिस्ट यांसारखी पत्रे चीनला बदनाम करण्यासाठी, तेथे चालू असलेल्या धर्मावरील अत्याचारांचीं भडक वर्णने करतात. मॉस्कोच्या कॉम्युनिस्ट पत्रांतील हें वर्णन पहा- "चीनमधील सांस्कृतिक क्रांतींत मुस्लिमांच्या मशिदी, बौद्धांचीं मंदिरें व मठ यांचा विध्वंस होत आहे. उश्गूर, ह्यू, तिबेटी, मंगोल, कझाख यांच्या धर्मभावनांचा पदोपदीं अपमान होत आहे. माओचे ठग, पेंढारी मुस्लिमांना मृतांचें दहन करण्यास भाग पाडतात व डुकराचें मांस सक्तीने खायला लावतात."
 'ओपिनियन' या पत्रांत (३०-७-१९६८) ही सर्व हकीगत देऊन लेखक ए. जी. नुराणी म्हणतात, "हें सर्व खरें आहे, पण ही टीका करण्याचा रशियाला