पान:इहवादी शासन.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०६ । इहवादी शासन
 

मानणारा मनुष्य म्हणजे नागरिक. ही जबाबदारीची जाणीव व ती पार पाडण्याची शक्ति या नागरिकाच्या ठायीं केव्हा येईल ? त्याच्या बुद्धीवर कसल्याह शृंखला नसल्या तर. विचार, उच्चार, आचार यांच्या बाबतींत तिला पूर्ण स्वातंत्र्य असेल तर. व्यक्तीला असें स्वातंत्र्य असले पाहिजे असे मत म्हणजेच व्यक्तिवाद. हा व्यक्तिवाद हा राष्ट्ररचनेचा पाया आहे आणि व्यक्तींवर अशी बंधनें असतां कामा नयेत, तिला पूर्ण स्वातंत्र्य असलें पाहिजे हे तर इहवादाचें पहिले तत्त्व होय.
 या राष्ट्रवादांतूनच लोकशाही परिणत होत असते. व्यक्तिस्वातंत्र्य हें तत्त्व तर तिला पायाभूत आहेच. शिवाय सर्व राज्यकारभार, देशाचें सर्व शासन यावर नागरिकांची सार्वभौम सत्ता असली पाहिजे, हें लोकशाहीचें आद्य महातत्त्व आहे. राष्ट्रवादांत हे तत्त्व असतेंच असें नाही. तेराव्या शतकांत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आदि देशांत राष्ट्रवाद उदयाला आला, पण त्या वेळी तेथे जनसत्ता सार्वभौम झाली नाही. ती जसजशी होत गेली तसतशी लोकशाही त्या देशांत विकसित होत गेली.
 जर्मनीत हिटलरच्या अंतापर्यंत तिचा पूर्ण विकास झालाच नव्हता. तेथे व्यक्तीला स्वातंत्र्य होतें, पण तें राजकीय क्षेत्रांत फार मर्यादित होते. जवळ जवळ नव्हतेंच. तेव्हा लोकशाहींत जनता हीच सार्वभौम सत्ता असते. पण कुराण किंवा बायबल यांच्या वचनान्वयेच कायदा झाला पाहिजे असा जेथे दंडक असतो किंवा "नाविष्णुः पृथ्वीपतिः।" अशी स्मृति असते तेथे जनता सार्वभौम असणें शक्य नाही. ते दंडक नाहीसे झाले तरच लोकशाही स्थापन होऊ शकते. पश्चिम युरोपांत प्रबोधन, धर्मक्रांति या युगांत प्रथम ते दंडक ढिले झाले व पुढे नाहीसे झाले तेव्हाच लोकशाहीच्या तत्त्वावर घडण झाली.
 सर्वधर्मसमानत्व हें असेच लोकशाहीला अवश्य असें तत्त्व आहे. धर्मामुळे कांही व्यक्तींना नागरिकत्वाचे हक्क जर मिळणार नसतील तर लोकशाहींतील समता, स्वातंत्र्य, बंधुता या विचारांना कांही अर्थच राहणार नाही. इंग्लंडमध्ये दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत कॅथॉलिक पंथावर बंधने होती. तीं नष्ट झाली तेव्हाच तेथील लोकशाहीला अर्थ व जोम प्राप्त झाला. अनेक मुस्लिम देशांत अशी बंधनें अजून आहेत. आणि भारतांत कायद्यांनी तशी बंधने नसली, तरी मुस्लिम समाज धर्म- समानत्वाचें तत्त्व मान्य करीत नाही. हे होत नाही तोपर्यंत लोकशाहींचा विकास होणें शक्य नाही.

आर्थिक समता

 समाजवादांत राष्ट्रवाद व लोकशाही या दोन्हींतील तत्त्वें तर समाविष्ट आहेतच. पण शिवाय आर्थिक समता आणि उत्पादन-साधनांवरची जनतेची सत्ता हीं आणखी दोन तत्त्वें समाजवादांत अभिप्रेत आहेत. प्रत्येक नागरिकाला अन्न,