पान:इहवादी शासन.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पृथ्वीप्रदक्षिणा । ३०५
 

शृंखलावद्ध करून टाकणारी अंध धर्मसत्ता, समाजाच्या ऱ्हासाला कारण होणार यांत शंका कसली ? ऐहिक उत्कर्षाची आकांक्षा म्हणजे प्रवृत्तिपरता हीच मानवाला सर्व उद्योगासाठी उद्युक्त करते. परवाद, निवृत्तिवाद यांमुळे ती प्रेरणाच नष्ट झाली आणि माणूस, "अपहाय निजं कर्म कृष्ण कृष्ण" करीत बसला, म्हणजे समाज दीनदरिद्री होणार, पराक्रमशून्य होणार हें सांगायला इतिहास कशाला हवां ? बुद्धि बद्ध झाली, शब्दप्रामाण्य आले की, धर्माची परिवर्तनशीलता नष्ट होते आणि मग कालबाह्य, जीर्ण स्मृतींचें अधिराज्य सुरू होतें.
 देशकाल न पाहतां केलेले कायदे सर्व प्रगति खुंटवितील हें पांडित्याच्या आश्रया- वांचूनहि कळण्याजोगे आहे. या अंध ग्रंथप्रामाण्यांतूनच असहिष्णुता निर्माण होते. कारण आपल्या धर्मग्रंथावांचून अन्य धर्मग्रंथ सत्य आहेत, असूं शकतील, हे अंधश्रद्ध समाजाला पटणेंच शक्य नाही. धर्मग्रंथ, धर्माचार्य यांच्या शब्दाला प्रामाण्य आलें की ते धर्माचार्य, त्यांचा शिष्यपरिवार, त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी आणि तत्सम दैवी शक्तीने संपन्न असे पुरुष यांची निराळी जात होऊन, समाजांत विषमता निर्माण होते, समतेचा लोप होतो आणि ही अविवेकी विषमता समाजाच्या विनाशाला निश्चित कारण होते.
 इहाकांक्षा संपल्या, निवृत्तिवाद प्रबळ झाला की, सर्वच उद्योग थंडावतात तशी ज्ञानोपासनाहि थंडावते आणि भौतिक सृष्टीचें ज्ञान म्हणजेच विज्ञान नाहीसें झालें की, मानवी मन भयग्रस्त होऊन धर्माचार्यांच्या जास्त जास्त आहारीं जातें आणि स्वतंत्र चिंतन, विवेकनिष्ठा यांमुळे अंध धर्मसत्तेला आव्हान देण्याचें जें मानसिक बळ, जें सामर्थ्य तें क्षीण होतें. त्याच्या अभावीं धर्मसुधारणा, समाजपरिवर्तन हें अशक्य होऊन बसतें आणि परिवर्तन नाही म्हणजे नाश हें ठरलेलेच आहे. तेव्हा बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्ति, विज्ञाननिष्ठा, परिवर्तनशीलता, स्वतंत्र चिंतन, विवेकसामर्थ्य, समता, सर्वधर्म समानत्व, सहिष्णुता हीं जीं इहवादाची तत्त्वें त्यांचा व समाज- उत्कर्षाचा कार्यकारणसंबंध आहे हें इतिहासाने जितकें, तितकेंच तर्कानेहि सिद्ध होतें.
 प्राचीन काळी सर्वसाधारणपणें धर्म हेंच समाजसंघटनेचें तत्त्व होतें. त्या काळांतहि इहवादाच्या लोपामुळे समाजाचा ऱ्हास झाला. मग अर्वाचीन काळांत राष्ट्रनिष्ठा, लोकशाही व समाजवाद या तत्त्वांवर समाजाची घडण झालेली असतांना इहवादाच्या अभावी काय होईल हें सांगण्याची देखील आवश्यकता नाही. इहवादांतूनच तीं तत्त्वें जन्माला आली आहेत. तो त्यांचा पायाच आहे. त्यावांचून समाज जगणार कसा ?

राष्ट्ररचनेचा पाया

 राष्ट्रनिष्ठा या पहिल्या तत्त्वाचाच विचार पाहा. राष्ट्र हें नागरिकांचें असतें. आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी आपल्या शिरीं आहे असें
 इ. शा. २०