पान:इहवादी शासन.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०४ । इहवादी शासन
 

इतिहासांत इहवादाचा उदय, विकास, लोप व पुनरुज्जीवन कसें घडत गेलें तें आपल्याला जाणतां आलें. वेदकालपासून भारताच्या आजच्या इतिहासांत असें अवगाहन आपण केलें तेव्हा आपली पृथ्वीप्रदक्षिणा पुरी झाली. ही प्रदक्षिणा करीत असतांना आपण बुद्धिवादाचें, विज्ञाननिष्ठेचें, सत्यशोधनाचें, विवेकप्रामाण्याचें व्रत घेतलें होतें. आता त्या व्रताचे उद्यापन करून पृथ्वीप्रदक्षिणेची सांगता करावयाची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या इहवादाच्या थोर आचार्यांना या सुप्रसंगी सांगतेच्या संकल्पाचे मंत्र सांगण्याची मीं विनंती केली आहे. त्यांनी सांगितलेल्या मंत्रांच्या श्रवणाने आपल्या पृथ्वीप्रदक्षिणेचें पुण्य आपल्याला निश्चित लाभेल, याविषयी आपल्यापैकी कोणालाहि शंका येणार नाही असें वाटतें.
 इहवाद म्हणजे समाजाची, राष्ट्राची उन्नति, इहवाद म्हणजे मानवी कर्तृत्वाचा विकास, इहवाद म्हणजे संस्कृतीचा उत्कर्ष आणि अंध धर्मवाद, धर्मसत्तावाद म्हणजे अवनति, अपकर्ष, मानवी कतृत्वाचा ऱ्हास, लोप हा सिद्धान्त वादातीत आहे असें अनेक राष्ट्रांच्या इतिहासावरून दिसून येतें.
 ग्रीस, रोम यांमध्ये बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, प्रवृत्तिपरता, विज्ञानोपासना हीं चालू होतीं तोंपर्यंत त्यांचा सतत उत्कर्ष होत गेला. पुढे ख्रिस्ती धर्माचा उदय झाला. हा धर्म शब्दाप्रामाण्यवादी, परनिष्ठ, निवृत्तिपर व पराकाष्ठेचा असहिष्णु होता, ज्ञानविन्मुख होता, धर्मसत्तावादी होता. त्यामुळे सर्व युरोपवर पुढील सात-आठ शतकें तमोयुगाची घनदाट छाया पसरून राहिली होती. त्या खग्रास ग्रहणांतून पश्चिम युरोप मुक्त झाला तो त्या प्राचीन ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे म्हणजे इहवादाच्या आश्रयामुळेच होय.

उत्कर्षाचे साधन

 रशिया, पोलंड, रुमानिया, बल्गेरिया इत्यादि पूर्व युरोपांतील राष्ट्रांनी ही संजीवनी अव्हेरली. त्यामुळे त्यांचें ग्रहण सुटले नाही. पश्चिम युरोपांतहि स्पेन- पोर्तुगाल हे देश याच करंटेपणामुळे अंधारांत राहिले. इस्लामी राष्ट्रांच्या इतिहासावरून हेंच दिसून आलें. प्रारंभीची तीन-चार शतकें अरब लोक सहिष्णु, उदारमतवादी, बुद्धिवादी, विज्ञानोपासक व परिवर्तनवादी असे होते; पण पुढे या इहवादी तत्त्वांचा लोप होतांच त्यांचा झपाट्याने ऱ्हास होऊन पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारापर्यंत तीं राष्ट्र नाममात्र जगत होतीं. त्या विद्येमुळे पुन्हा त्यांना जाग आली व थोड्याच अवधींत त्यांच्यांत नवचैतन्य दिसूं लागलें. भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन इतिहासावरून हाच सिद्धान्त दृढ होतो. इहवाद म्हणजे उत्कर्ष, परवाद म्हणजे ऱ्हास!
 हा कार्यकारणभाव इतिहासानेच सिद्ध होतो असें नाही. तर्कानेहि त्याला तशीच पृष्टि मिळते. प्रज्ञा, बुद्धि हेंच मानवाचे एकमेव उत्कर्षाचें साधन. ती बुद्धीच