पान:इहवादी शासन.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पृथ्वीप्रदक्षिणा



 इहवाद म्हणजे काय, इहवादी शासन म्हणजे काय, याचा विचार करून भारतीय जनता इहवादी कशी होईल आणि भारतीय शासनाला विशुद्ध इहवादी रूप कसें प्राप्त होईल याचें चितन आपल्याला करावयाचें होतें. त्यासाठी जगांतील सर्व देशांत इहवादाचें स्वरुप पूर्वी कसें होतें, आज कसें आहे, त्याचा उदय, विकास, लोप, पुनरुज्जीवन कसें घडत आलें, इहवादी तत्त्वांचा समाजाच्या उत्कर्षापकर्षाशी दृढ संबंध कितपत असतो हें पाहणें अवश्य होतें. त्यासाठीच आपण पृथ्वीप्रदक्षिणेस निघालों. प्रथम आपण सोव्हिएट रशियाला भेट देऊन जडवाद आणि इहवाद यांची प्रतिज्ञा घेतलेल्या कम्युनिस्ट शासनाच्या इहवादाचें रूप न्याहाळलें. इहवादाचा नित्य घोष करणाऱ्या तेथल्या शासनाचा इहवाद तकलुपी असून, खऱ्या इहवादी तत्त्वांसाठी तेथल्या शास्त्रज्ञांना त्या शासनाशी प्राणपणाने झुंज घ्यावी लागत आहे, हें पाहून आपल्याला नवल वाटलें. तेथून आपण तुर्कस्थान, अरबस्थान, इजिप्त, इराण या मुस्लिम देशांत गेलो. भारतांत कोट्यवधि मुस्लिम आहेत त्यांना भारतापेक्षा हे देश जवळचे वाटतात. तेव्हा तेथे इहवाद कितपत अवतरला आहे, मान्य झाला आहे, हें पाहणें अवश्य होतें. पाश्चात्त्य विद्येच्या प्रभावाने यांतील बहुतेक राष्ट्रं इहवादाच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत आहेत हें पाहून आपल्या मनाला बराच दिलासा वाटला.
 इटली, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड हीं पाश्चात्य राष्ट्र म्हणजे इहवादाची जन्मभूमि. इहवादाचीं तत्त्वें तेथेच प्रथम निश्चित झाली. तेव्हा त्या देशांत फेरफटका करणें क्रमप्राप्तच होतें आणि त्यांच्या संस्कृतीचें मूलगृह म्हणजे जी ग्रीक भूमि तिलाही धांवती भेट देणें अपरिहार्य होते. हा सर्व प्रवास जरा दगदगीचा झाला. पण त्या वेळी केलेल्या अवलोकनाने इहवादाचें सर्व तत्त्वज्ञान प्रत्यक्षांत आणतांना कोणती किंमत द्यावी लागते हें आपल्याला जवळून पाहतां आलें. आणि तो लाभ झाल्यामुळे आपल्या श्रमांचा परिहार झाला.
 अशी प्रदक्षिणा करून आपण भारतांत परत आल्यावर नव्या प्रशिक्षित दृष्टीने आपण आपल्या इतिहासाकडे पाहूं शकलो. त्यामुळे या देशाच्या दीर्घकालीन