पान:इहवादी शासन.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आचारसंहिता । ३०१
 

समाजाला घातक अशा अनंत रूढि या जुन्या शास्त्रकारांनी धर्माच्या आधारेंच उभ्या केलेल्या आहेत. डॉ. आंबेडकरांनी यासाठीच म्हटलें आहे की, "हिंदु धर्म इतका सर्वंकष आहे की, धर्मांत हस्तक्षेप करावयाचा नाही असें ठरविलें, तर भारतांत कोणतीहि सुधारणा शक्य होणार नाही."

घटनाकारांची भूमिका

 यासाठीच भारताच्या घटनाकारांनी 'सेक्युलर' हा शब्द मुद्दाम टाळलेला आहे. तो शब्द घालावा अशा दोन-तीनदा सूचना आल्या होत्या. पण तरीहि तो जाणूनबुजुन नि कटाक्षाने टाळण्यांत आला. कारण समाजांतील घातक रूढि नष्ट करण्यासाठी कोणत्याहि धर्मांत हस्तक्षेप करण्याचा शासनाला अधिकार आहे, अशीच घटनाकारांची भूमिका आहे. ही भूमिका व इहवादाचा खरा अर्थ आपण ध्यानांत घेतला तर मंदिराच्या कारभारांत शासनाने हात घालावा की नाही, कुटुंबनियोजन शासकीय पातळीवरून करावें की नाही, शास्त्री पंडितांचा सत्कार करावा की नाही, या प्रश्नांची उत्तरे सुलभ होतील.
 अवश्य तेथे शासनाने हस्तक्षेप तर करावाच, पण बुद्धिप्रामाण्य, विज्ञानदृष्टि, ऐहिक उत्कर्ष यांच्या मर्यादा सांभाळून धर्मभावनेलाहि शक्य तेथे उत्तेजन द्यावें, तिचें पोषण करावें, यांतहि आक्षेपार्ह असें कांही नाही. राष्ट्रभावना, कलाभिरुचि, सत्य-जिज्ञासा, ज्ञानलालसा यांच्याइतकीच धर्मभावना ही समाजाच्या उत्कर्षाला आवश्यक आहे.
 व्हाल्टेअर हा फ्रेंच तत्त्ववेत्ता धर्माचा कडवा द्वेष्टा, कडवा शत्रु म्हणून प्रसिद्ध आहे. पण आपण हें ध्यानांत घेतले पाहिजे की, त्याने आग पाखडली ती रूढिबद्ध, अंध कर्मकांडात्मक धर्मावर. त्याने सुरुंग लावला तो धर्माच्या नांवाने अधर्म आचरणाऱ्या पोप-पीठाला. एरवी त्याची परमेश्वरावर उत्कट श्रद्धा होती. इतकी की, तो म्हणे "देव नसला तर मानवाला तो निर्माण करावा लागेल." मृत्यु- समयीं अमेरिकन क्रांतिनेता बेंजामीन फ्रँकलीन आपल्या नातवाला घेऊन त्याला भेटायला आला होता. त्या लहान मुलाला आशीर्वाद देतांना त्याच्या मस्तकावर हात ठेवून व्हाल्टेअर म्हणाला, "परमेश्वर आणि स्वातंत्र्य यांची उपासना कर." या दोन उपासना एकत्र असूं शकतात. नव्हे, परस्परपोषक असू शकतात.

पंडितजींची श्रद्धा

 पंडित नेहरूंची हीच श्रद्धा होती. ते म्हणतात, "मानवी जीवनाला केवळ भौतिक संभार पुरेसा नाही. प्रगति, ध्येय, दैवी संपत्ति, मानवी भवितव्य यांवरील श्रद्धेचा परमेश्वरावरील श्रद्धेशी निकटचा संबंध आहे. त्या श्रद्धेचें तरी तर्क, बुद्धि, यांनी समर्थन कोठे करतां येतें ? तेंच परमेश्वरावरील श्रद्धेचें आहे. असे असले तरी