पान:इहवादी शासन.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०० । इहवादी शासन
 

त्सवांत शासन सहभागी झाले तरी अंध श्रद्धा, शब्दप्रामाण्य बळावेलच आणि भौतिक प्रगति खुंटेलच असे नाही. केवळ परमार्थक्षेत्रापुरतीच धर्मश्रद्धा मर्यादित केली, तर ती आपत्ति टाळतां येते. पाश्चात्त्यांनी ती यशस्वीपणें टाळली आहे. तेव्हा ही सावधगिरी ठेवल्यानंतर जनतेच्या धर्मबुद्धीचा विकास करणें, त्यासाठी साह्य करणें, आणि तिच्या धार्मिक उत्सव समारंभांत शासनाने सामील होणें यांत कांहीच आक्षेपार्ह नाही; नव्हे तें शासनाचे कर्तव्यच आहे. कारण परमेश्वरी कृपेच्या, आशीर्वादाच्या कल्पनेवरच माणूस जगतो, उभारी धरतो, आशावादी राहू शकतो. ती नसेल तर या जीवनाचें सर्व सौभाग्य नष्ट होईल.

फोल आक्षेप

 अस्पृश्य, अनुसूचित जाति, मागासलेले वर्ग यांना शिक्षणांत व राजकीय क्षेत्रांत विशेष सवलती द्याव्या की नाही हा प्रश्न असाच इहवादाचा विपरीत अर्थ केल्यामुळे निर्माण झालेला आहे. विशिष्ट जातींना सवलती देणें हा पक्षपात आहे, इहवादी शासनाला तो शोभत नाही, असा आक्षेप डोनाल्ड यूजीन स्मिथ याने घेतला आहे. पण तो अगदी फोल आहे. बुद्धि, तर्क, अनुभव, इतिहास, व्यवहार यांच्या दृष्टींतून सामाजाच्या उत्कर्षाला अवश्य ते कायदे करणें, अवश्य ते आचार करणें, संकेत प्रस्थापित करणें हा इहवादाचा, सेक्युलॅरिझमचा खरा अर्थ आहे.
 त्यादृष्टीने पाहतां अस्पृश्यांना, आदिवासी वन्य जमातींना जादा सवलती देणें हें शासनाचे कर्तव्यच आहे. सवलती जातीच्या कसोटीवरून न ठरवितां दारिद्र्य, गरिबी अशा आर्थिक कसोटीवरून ठरवाव्या असें स्मिथ म्हणतो. इतर पुष्कळांनी हा विचार मांडला आहे. पण अस्पृश्य, आदिवासी यांच्या उन्नतीच्या मार्गात दारिद्र्य ही एकच धोंड नाही ही गोष्ट हे पंडित ध्यानी घेत नाहीत. अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार, सवर्ण समाजांत त्यांच्याबद्दल असलेला तिटकारा यांमुळे त्यांच्यावर इतर अनेक आपत्ति येतात, जाचक बंधने येतात. त्या सर्वांतून मुक्त होऊन त्यांचा मार्ग सुकर व्हावा यासाठी त्यांना जादा सवलती देणें आवश्यकच आहे.
 निधर्मी शासनाने जाति-जातींत भेद करणें युक्त नाही, असा एकच आग्रह आपण धरून बसलों, तर असल्या नियमांना जुन्या कर्मकांडाचें रूप येईल. गंध आडवें लावावें की उभें, हात उजव्या बाजुने फिरवावा की डाव्या अशा सारखे इहवादाचे ते नियम होऊन बसतील. देवदासी-मुरळी पद्धति ही कायद्याने बंद केली तें स्मिथच्या मतें योग्य झालें. पण अस्पृश्यांना सर्व मंदिरें कायद्याने खुलीं केलीं हें त्याच्या मतें इहवादाच्या दृष्टीने योग्य झाले नाही. कारण पहिली सामाजिक सुधारणा असून, दुसरी धार्मिक सुधारणा होय आणि धर्मात हस्तक्षेप करणें हें इहवादी तत्त्वाच्या विरुद्ध आहे. स्मिथने केलेला हा फरक अगदी भ्रांत आहे. मुरळी देवाला वाहणें ही रूढि धर्म- प्रेरितच आहे, हें. त्याला ठाऊक नसावें असें दिसतें. आणि ही एकच रूढि नव्हे, तर