पान:इहवादी शासन.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९८ । इहवादी शासन
 

ग्रंथांप्रमाणे पूजाअर्चा करणें हें व्यवहारतः अशक्य आहे. सरकार दरसाल सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करतें. त्या वेळीं प्रत्येक धर्माच्या सर्व उपासाउत्सवांना सुट्टया द्यावयाचें ठरविलें, तर वर्षांतून बहुतेक सर्व दिवस सुट्ट्याच द्याव्या लागतील. त्यामुळे या बाबतींत बहुसंख्य जो हिंदु समाज त्यांच्या उपवास-उत्सवांची प्रथम दखल घेणें हें अपरिहार्यच होऊन बसतें.
 हाच न्याय सर्वत्र अवलंबिला पाहिजे. त्या त्या प्रसंगी बहुसंख्य लोकांच्या श्रद्धे प्रमाणे धार्मिक विधि आचरणें हेंच धोरण स्वीकारणें युक्त होय. आणि शासकीय अधिकारी किंवा कोणी अन्य नेता हा जनतेचाच प्रतिनिधि असल्यामुळे त्याने त्यांत सहभागी होण्यास हरकत नाही. एवढेच नव्हे, तर त्याने अवश्य सहभागी झालें पाहिजे असाच दंडक असणें अवश्य आहे. कारण त्यावांचून शासन आपले आहे भारतीय आहे, स्वकीय आहे, असें लोकांना वाटणार नाही. ते आंतरिक समाधान त्यांना मिळणार नाही.

परमेश्वरावरील श्रद्धा

 असल्या धार्मिक विधीमुळे, आचारांमुळे अंध श्रद्धेला उत्तेजन मिळतें आणि अंध श्रद्धा ही इहवादाला अतिशय विघातक होते असा एक पक्ष आहे. या बाबतीमध्ये समाजहितचिंतकांनी एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे की, परमेश्वरावरील श्रद्धेवांचून कोणताहि समाज जगणें अशक्य आहे. कोणत्या तरी सर्वगामी, सर्वज्ञ व सर्व- समर्थ अशा शक्तीचा पाठिंबा असल्यावांचून मनुष्याला या अत्यंत दुःखमय संसारांत धीराने टिकून राहणें शक्य नाही. विल ड्युरंट या आजच्या सर्वश्रेष्ठ इतिहास- पंडिताने म्हटले आहे की, जोंपर्यंत जगांत दारिद्र्य आहे तोंपर्यंत देव हा असणारच. मानवाने विज्ञानाच्या साहाय्याने कितीहि समृद्धि आणली आणि समाजाच्या भौतिक गरजा कितीहि पुरविल्या, तरी मनुष्यजातीचें दुःख दशांशाने सुद्धा कमी होईल, असें दिसत नाही.
 पाश्चात्त्यांच्या उदाहरणावरून हें फारच स्पष्ट होत आहे. ईश्वर, धर्म यांना अफू मानून त्या सर्व कल्पना निखालस नष्ट करण्याचें कंकण बांधून ज्यांनी क्रांति केली त्या सोव्हिएट नेत्यांनाहि युद्धप्रसंगी त्या शक्तींनाच शरण जावें लागलें आणि शासकीय प्रयत्नाने धर्मभावनेचें पुनरुज्जीवन करून तिला आवाहन करावें लागलें. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्तांच्या साहाय्याने फ्रेंच सेना पॅरिसमध्ये शिरल्या तेव्हा सेनापतीने पहिली आज्ञा कोणती दिली ? प्रत्येक चर्चमध्ये घंटानाद करावा व धर्मगुरूंनी प्रार्थना करावी. दुसऱ्याच दिवशीं जनरल द् गॉल यांनी प्रथम मृत सैनिकांच्या समाधीवर क्रॉस ठेवला आणि तेथून ते मिरवणुकीने नोत्रदाम या चर्चमध्ये गेले. रशियांत किंवा फ्रान्समध्ये हे शास्ते धर्मोत्सवांत सामील झाले नसते, तर जनतेला प्रेरणा, स्फूर्ति, मिळाली असती काय ? समाधान लाभलें असतें काय ?