पान:इहवादी शासन.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८ । इहवादी शासन
 

इस्लामवर पुन्हा हल्ले सुरू झाले. 'एसेज् इन दि स्टडी ऑफ इस्लाम इन् दि यू. एस्. एस्. आर्.'- लेखक स्मर्नाव्ह- हें पुस्तक रशियांतील सायन्स ॲकॅडमीने १९५४ मध्ये प्रसिद्ध केलें. या पुस्तकाच्या पानापानांत इस्लामचा द्वेष भरला आहे. याच वेळी सोव्हिएट पंडित इस्लामविरोधी प्रचार आणि नास्तिक पंथाचा प्रचार पुरेसा होत नाही, अशी तक्रार करीत होते. पण असे असूनहि आता तुर्किस्तानांत कम्युनिस्ट तत्त्वाज्ञनाचा प्रसार खूपच झाला असल्यामुळे सोव्हिएट शासनाच्या धोरणाचे समर्थन करणारे अनेक मुस्लिम लेखक, पंडित, मुत्सद्दी व धर्मगुरूहि आढळून येऊ लागले. तेव्हा सोव्हिएट नेत्यांच्या क्रांतीच्या प्रयत्नाला बरेंच यश आलें आहे, येत आहे, असे दिसून येतें. ताजिक साहित्य- परिषदेचे अध्यक्ष मिर्झो टुरसन झेद, कझाक लेखक मुखतार औसोव्ह, अवई कुनंवयेव हे या वर्गातले लेखक आहेत. मार्क्सवाद, ऑक्टोबर क्रांति यांचा गौरव करून ते इस्लामच्या वर्चस्वावर मुल्लांच्या पिसाटपणावर कडक टीका करतात. अशा लेखकांचा सोव्हिएट नेते, रशियाबाहेर, रशियांतील धर्मस्वातंत्र्याचा, सर्वधर्मसमानत्वाचा प्रचार करण्यासाठी उपयोग करून घेतात. १९५५ सालापर्यंत मुस्लिम लेखक, पंडित, वक्ते यांना रशियाबाहेर जाण्यास मुभा नव्हती. आता ते बाहेर जाऊन, सोव्हिएट नीतीचा गौरव करतील अशी खात्री झाल्यामुळे, अशा लोकांची सदिच्छा मंडळें बाहेर पाठविण्यांत येतात. इमाम सापोकारी यांच्या अध्यक्षतेखाली असें एक मंडळ १९५५ साली मक्केला गेलें होतें. पुन्हा १९५६ सालीं कमरुद्दिन सालिखोव्ह यांच्या नेतृत्वाखाली असेंच एक दुसरें मंडळ अनेक मुस्लिम देशांत जाऊन आले. यांत अनेक मुल्ला होते व त्यांनी मक्केला सर्व धार्मिक विधीहि केले !

श्रेष्ठतेची अहंभावना

 हीं शिष्टमंडळे, हे विद्वान लोक बाहेरच्या देशांत जाऊन, रशियांत पूर्ण धर्मस्वातंत्र्य आहे, असा प्रचार करतात. वरील मंडळाने इजिप्तमध्ये अनेक व्याख्यानें दिली व त्यांत, खरें धर्मस्वातंत्र्य रशियांतच आहे, तेथे मुस्लिमांना स्वतःच्या मद्रसा (शाळा) चालवितां येतात, धार्मिक वाङमय प्रसिद्ध करतां येतें असें मोठ्या अभिमानाने सांगितले, आणखी एक विचार रशियाबाहेर जाणाऱ्या लोकांच्या व्याख्यानांतून नित्य व्यक्त होत असतो. रशियन तुर्किस्तानांतील मुस्लिम हे इतर देशांतल्या मुस्लिमांपेक्षा श्रेष्ठ असून, त्या इतर कमनशिबी धर्मबंधूंना साह्य करून त्यांना सुधारणें हें आपले कर्तव्य आहे, असें ते सांगत फिरतात. एका अमेरिकन अभ्यासकाने १९५३ साली ३१ मुस्लिम निर्वासितांची मुलाखत घेतली. त्यांच्या बोलण्यांतहि हा भाव दिसून आला. सोव्हिएट मुस्लिमांबद्दल ते अभिमानाने बोलत होते व इराणी, तुर्की व एकंदर आशियाई