पान:इहवादी शासन.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९० । इहवादी शासन
 

हें अत्यंत अवश्य असतें. पण तसें करतांना जी टीका करावी लागते ती अन्य धर्मीयांकडून आली तर कोणालाहि ती सहन होणार नाही. राजा राममोहन रॉय, लोकहितवादी, म. फुले, रानडे, आगरकर, दयानंद, विवेकानंद यांनी स्वतःच्याच हिंदु धर्मावर इतकी कडक टीका केली की, त्यांच्या काळच्या हिंदु समाजाला ती असह्य झाली होती.
 लो. टिळकांना सनातनी समजण्याची चाल आहे. पण 'गीतारहस्यां'त त्यांनी श्रीशंकराचार्यांवर जी टीका केली तीमुळे हिंदु समाजांतच प्रचंड गदारोळ उठला होता. स्वा. सावरकरांना तर अनेक लोक हिंदु धर्माचे वैरीच मानतात. पण या थोर पुरुषांनी प्रखर टीका करून जी धर्मशुद्धि केली व जे धर्मपरिवर्तन घडवून आणलें त्यामुळेच हिंदु समाजाची प्रगति झाली यांत शंका नाही. प्रत्येक धर्मालाच अशी शुद्धि व असें परिवर्तन घडविल्यावांचून गत्यंतर नसतें. पण असें असले तरी हें कार्य कोणी अन्य धर्मीय करूं लागतांच त्यामुळे तीव्र प्रक्षोभ माजल्यावांचून राहणार नाही. आणि धर्मशिक्षण शालेय विषयांत समाविष्ट केलें तर ही गोष्ट अटळ होऊन बसेल. तेव्हा शासकीय विद्यालये किंवा शासनाच्या अनुदानाच्या साह्याने चालणारी विद्यालयें यांत धर्म हा वर्ज्य करणें हेंच हिताचें होईल. धर्मशिक्षणाची व्यवस्था त्या त्या समाजाने आपापल्यापुरती स्वतंत्रपणे करणे हाच प्राप्त परिस्थितींत, इहवादाच्या दृष्टीनेहि, समंजस मार्ग होय असें वाटतें.

भि परंपरा

 पण धर्म हा विषय वगळला म्हणजे भिन्नधर्मीय समाजांतील शिक्षणाची समस्या सुटली असें मात्र होत नाही. भारतांतील हिंदु, मुस्लिम व ख्रिश्चन हे धर्म व त्या धर्मांचे अनुयायी, समाज हे परस्परांपासून इतके भिन्न आहेत, त्यांच्या परंपरा त्यांचे इतिहास, त्यांचे आचार आणि त्यांचीं मूल धर्मतत्त्वेंहि इतकी विषम, इतकी विसंवादी व इतकी अन्योन्यछेदक आहेत की, आजच्या रूढ शालेय विषयांतला कोणताहि विषय एकत्र शिकविणें अशक्य होऊन बसावें. आणि धर्मशिक्षण हे वर्ज्य मानलें, तरी इतर विषय तसें मानणें अशक्य असल्यामुळे खरी समस्या त्या विषयासंबंधीचीच आहे.
 इतिहास हा विषय घ्या. भारताच्या गेल्या अनेक शतकांचा इतिहास हा हिंदु- मुस्लिम संघर्षाचा असल्यामुळे तो शिकवितांना काय धोरण ठेवावें असा प्रश्न येतो. वास्तविक इतिहाससंशोधकांनी निवडून, चाळून, पारखून जें सत्य म्हणून सांगितलें असेल तें शिकवावें आणि विवेकाने तें ऐकण्याची, शिकण्याची तयारी सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांनी करावी हाच युक्त मार्ग होय. पण भारतांत असें होणें कधीहि शक्य नाही. कारण मुस्लिम समाज असा विवेक कधीहि दाखविणार नाही. आणि त्याच्या अविवेकी, अंध वृत्तीला खतपाणी घालणें हें भारतीय शासनाचें धोरण आहे.