पान:इहवादी शासन.pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आचारसंहिता


शिक्षण


 भारतांतील इहवादाचा विचार केल्यानंतर आता इहवादाच्या आचारसंहितेचा विचार करणें युक्त ठरेल. इहवादाच्या आचारसंहितेंतील सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण हा होय. भिन्नधर्मीय, पंथीय व जातीय अशा समाजांतील विद्यार्थ्यांना एकाच शिक्षणसंस्थेत व एकाच वर्गांत शिक्षण सध्या देण्यांत येतें. तेव्हा कोणत्याहि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या भावना न दुखवितां सर्वांना आजच्या बहुविध विषयांचें शिक्षण कसें द्यावें, हा आपल्या पुढला फार बिकट असा प्रश्न आहे.
 या बहुविध विषयांतील धर्म हा विषय इतका नाजूक आहे, इतका स्पर्शाक्षम व इतका सुलभक्षोम आहे की, शाळा-महाशाळांतून हा विषय वर्ज्यच मानला पाहिजे, सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना एकत्र धार्मिक शिक्षण देणें अशक्य आहे, असेंच बहुतेक सर्व शिक्षणतज्ज्ञांनी आपलें मत दिलें आहे. सर्व धर्मांचीं मूलतत्त्वें सारखींच आहेत, सत्य, अहिंसा, दया, परोपकार, परमेश्वरावरील श्रद्धा, मातृभक्ति, पितृभक्ति, विनय- शीलता इत्यादि उदात्त तत्त्वांविषयी कोठेहि दुमत असणें शक्य नाही असें म्हटलें जातें; आणि त्यामुळे या तत्त्वांपुरतें धर्मशिक्षण शाळा, महाशाळांतून एकत्र देण्यास हरकत नाही असा एक विचार मांडला जातो.
 पण एक तर हें म्हणणें तितकेसें खरें नाही. या तत्त्वांना जवळ जवळ प्रत्येक धर्मांत अपवाद सांगितलेले आहेत आणि कित्येक वेळा त्यांचा आचार हाच अधर्म ठरेल, असेंहि मत धर्मवेत्त्यांनी मांडलेलें आहे. आणि दुसरें म्हणजे वरील तत्त्वें इतर आचारांशीं व जड कर्मकांडाशी इतकी निगडित आहेत, इतकीं एकरूप झालेलीं आहेत की, त्यांचें निराळें शिक्षण देणे सर्वथा अशक्य आहे.
 शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानांत घेतली पाहिजे. प्रत्येक धर्मांत अनेक हीन आचारांचें दुष्ट रूढींचें व निषिद्ध अशा विचारांचेंहि प्राबल्य माजलेलें असतें. त्यांवर प्रखर टीका करून त्यांचें घातकत्व समाजाला पटवून देणें
 इ. शा. १९