पान:इहवादी शासन.pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८८ । इहवादी शासन
 

सांगितला आहे. ही वृत्ति मानवी कर्तृत्वाची जोपासना करते. हिच्या अभावीं समाजाचें कर्तृत्व खुरटतें व पुढे त्याचा लोप होतो, हें अनेक समाजांच्या इतिहासांवरून तेथे दाखविलें आहे. पारशी समाज अत्यंत अल्पसंख्य असून, त्याने दादाभाई, जीजीभाई, जमशेटजी टाटा, मादाम कामा, मेथा, नरीमन, भाभा, माणेकशा यांसाखे अखिल भारताला भूषणभूत होणारे स्त्री-पुरुष निर्माण केले हें एकच प्रमाण त्या समाजाच्या इहवादी वृत्तीविषयी साक्ष देण्यास पुरेसें आहे.
 सर सय्यद अहंमदखान हिंदू व मुस्लिम जमातींच्या लोकांना लष्करांत एका पलटणींतसुद्धा घालूं नये, तसें केल्यास त्यांच्यांत बंधुभाव निर्माण होण्याचा धोका आहे, असें १८५८ सालापासून इंग्रज सरकारला बजावीत होते. तर त्याच वेळीं पारशी समाजाचे धुरीण अखिल हिंदी जनतेसाठी संस्था स्थापीत होते व इंग्रज सरकारचा रोष ओढवून घेत होते. 'वंदे मातरम्' हें राष्ट्रगीत रद्द करावें अशी मुस्लिमांची सहकार्याची पहिली अट होती. तर मादाम कामांनी भारतीय राष्ट्रध्वजाचें भूषण म्हणून त्यावर ती अक्षरें काढलीं होतीं व त्या नांवाचें पत्रहि चालविलें होतें. आम्हांला स्वतंत्र सुभा पाहिजे, जास्त हक्क पाहिजेत. प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व सर्व क्षेत्रांत पाहिजे अशी मुस्लिमांची प्रथमपासून मागणी होती व पाकिस्तानानंतरहि ती कायम आहे. पारशी समाजाच्या नेत्यांनी चुकून सुद्धा अशी मागणी कधी केली नाही. अखिल भारतीयांचे जें सुखदुःख तेंच आपलें असें या भूमीवर पाऊल ठेवल्यापासून ते मानीत आले व त्यांचें ते ब्रीद आजहि अविचलित आहे. त्यांनी लाखांनी, कोटोंनी दानधर्म केला पण इतरांचें धर्मांतर करावें असा विचार स्वप्नांतहि आणला नाही.
 पारशीसमाज हा खराखुरा राष्ट्रीय समाज आहे, भारताच्या राष्ट्रीय आशा- आकांक्षांशीं तो मनापासून एकरूप झाला आहे हें यावरून स्पष्ट होईल. आणि इहवादावांचून राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष होत नसतो हे मागें अनेक ठिकाणीं दाखवून दिलेच आहे.