पान:इहवादी शासन.pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रमुख धर्मपंथांचें कार्य । २८७
 

जी सोशॅलिस्टांची परिषद् भरली होती तेथे त्यांनी भारताचा ध्वज फडकविला. आणि हें आमच्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचें निशाण आहे, असें जाहीरपणे सांगितलें.
 इहवाद, पुरोगामी वृत्ति, भारतीय दृष्टि, जातीयतेपासून मुक्तता या दृष्टीने पाहतां सर फेरोजशहा मेथा हे भारताचे असेच आदर्श नागरिक ठरतात. त्यांचे चरित्रकार सर होमी मोदी यांनी "फेरोजशहा प्रथम भारतीय होते व नंतर पारशी होते, आणि असें पुनः पुन्हा जाहीर करण्यांत त्यांना भूषण वाटे," असें आवर्जून अनेक वेळा सांगितले आहे. १८६४ साली फेरोजशहा इंग्लंडला गेले. त्या सालीं रुस्तुमजी जमशेटजी जीजीभाई यांनी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी जाऊं इच्छिणाऱ्या हिंदी विद्यार्थ्यांसाठी दीड लाखाची रक्कम देऊ केली होती. हिंदु, मुस्लिम, पारशी सर्व जमातींना ती उपलब्ध होती. त्या निधीतून पैसे घेऊन फेरोजशहा विलायतेला गेले. तेथे दादाभाईनी अखिल हिंदी जनतेच्या उत्कर्षासाठी स्थापिलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचे ते सभासद झाले. पारशी जमातीचे एक पंचायत बोर्ड आहे. त्यामार्फत त्यांच्या धर्मादाय निधीची व्यवस्था होत असते. इंग्लंडहून परत आल्यावर त्या निधीच्या विश्वस्ताच्या जागेसाठी फेरोजशहा उभे राहिले. पण जीर्णवादी, अंध, प्रतिगामी वृत्तीच्या लोकांनी त्यांना जबर विरोध केल्यामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पारशी समाज हा प्रगतिशील आहे. पण सर होमी म्हणतात की, "तो कधी कधी कमालीचा अंध होतो व मग जीर्ण, दुष्ट रूढींचा पुरस्कार करतो." तसेच या वेळीं घडलें. फ़ेरोजशहा आपल्या भाषणांत नेहमी म्हणत की, जो पारशी आपल्या जन्मभूमीशीं एकनिष्ठ आहे, जो या भूमीच्या सर्व कन्यापुत्रांशी बंधुभाव मानतो व या भूमींतल्या सर्व जाति जमातींच्या लोकांशीं पूर्ण सहकार करून सर्वांच्या सामुदायिक, सार्वजनिक उद्दिष्टांसाठी जो झगडतो तोच खरा सच्चा पारशी होय. पारशांचें सुखदुःख अखिल भारतीय राष्ट्राच्या सुखदुःखाशी निगडित आहे, हें त्यांनी विसरूं नये, असे ते स्वसमाजाला वारंवार बजावीत. फेरोजशहांनी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मुंबई विद्यापीठ, काँग्रेस अशा सर्व सार्वजनिक संस्थांत काम केलें तें याच व्यापक दृष्टीने.
 पारशी समाज इहवादाच्या दृष्टीने कसा पुरोगामी आहे तें यावरून दिसून येईल. त्या समाजांत प्रतिगामी वृत्तीचे लोक नाहीत असें नाही. मध्यंतरी एकदा पंचांगाच्या वादावरून त्या जमातींत तीन फळया पडल्या होत्या व अगदी बेटीबंद जाति झाल्या होत्या. पण लवकरच हे भेद विवेकी लोकांनी मोडून काढले. त्यांच्यांतहि पडदा व बालविवाह या रूढि पडल्या होत्या. पण १८५१ साली सुधारक तरुण पक्षाने 'रहनुमाई मझ्दयस्नन' नांवाची एक सभा स्थापून या रूढि बंद करून टाकण्यांत यश मिळविलें. त्यांच्या स्मशानभूमींतील गिधाडांच्या भक्ष्यस्थानीं प्रेतें देण्याच्या चालीवरून सध्या जुन्यानव्या पक्षांत कांही वाद चालू आहे. पण तुलनेने पाहतां या गोष्टी गौण आहेत. इहवादी वृत्तीचा एक प्रधान निकष मागे एक-दोनदा