पान:इहवादी शासन.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । १७
 

आहे. पण तुर्कस्थान, इजिप्त, सिरिया, इराक या मुस्लिम देशांतहि तो मूळ स्वरूपांत राहिलेला नाही. सोव्हिएट रशियांत तर नाहीच नाही. सत्ता हाती येतांच इस्लामशीं संग्राम करण्याचें धोरण ठरवून सोव्हिएट शासनाने, इस्लामच्या तीन संस्था नष्ट करण्याचें ठरविले; १ वक्फ धर्मसंस्थांची स्थावर-जंगम मिळकत, २ कुराणप्रणीत धार्मिक विद्यालये आणि ३ शरियत न्यायालयें, या त्या तीन संस्था होत. वक्फच्या आश्रयानेच मुस्लिम धार्मिक शाळा चालत. नव्या पिढीचें शिक्षण मुल्ला-मौलवींच्या हाती ठेवावयाचें नाही हा तर सोव्हिएट शासनाचा कृतनिश्चय होता. समाजवादी समाजरचनेच्या स्थापनेसाठी, उभारणीसाठी सोव्हिएट नेत्यांना नवा माणूस निर्मावयाचा होता. मुल्ला-मौलवींच्या शाळांतून असा माणूस निर्माण होणे शक्य नव्हतें. विज्ञान, जडवाद, मार्क्सवाद, त्यांतील विरोधविकासवाद, नास्तिकवाद, यांचे शिक्षण त्यांना विद्यार्थ्यांना द्यावयाचें होतें. म्हणून त्यांनी प्रथम वक्फ जप्त केलें व जुन्या शाळा बंद करून तेथे सर्वत्र नव्या शाळा स्थापन केल्या. नव्या शाळांत त्यांनी रशियन भाषा सक्तीची केली व अरबी लिपीच्या ऐवजी लॅटिन लिपी आणली. मुलींना मुलांप्रमाणेच शिक्षण देण्याची व्यवस्था केली आणि अनेक ठिकाणी मुलामुलींचें एकत्र शिक्षणहि रूढ केलें.
 वर सांगितलेले स्त्रीबंधविमोचन आणि हें नवें भौतिकवादी शिक्षण हें शरियतला मान्य होणें शक्य नव्हतें. केमालपाशाने तर सत्ता हाती येतांच एक-दोन वर्षातच शरियत हा मुस्लिम कायदा बंद करून स्विस कायदा तुर्कस्थानांत जारी केला. सोव्हिएट नेत्यांनी तेच धोरण, पण जरा मंदगतीने अमलांत आणले. दरसाल कांही शरियत न्यायपीठे बंद करण्यास त्यांनी प्रारंभ केला. उझबेकिस्तानांत १९२५ सालीं अशीं ८७ न्यायपीठें होतीं तीं १९२६ साली त्यांनी २७ केली व १९२७ सालीं शून्यावर आणली.
 तुर्किस्तानांतील मुस्लिम समाजाने याचा अत्यंत कडवेपणाने व निर्धाराने प्रतिकार केला पण सोव्हिएट शासनाने त्याच्या दसपट क्रौर्याने तो मोडून काढला. कॉकेशस मध्ये अडझर प्रजासत्ताकांत आणि चेचियानामध्ये भयंकर दंगे झाले. चेचियानांत अनेक इमाम एकत्र येऊन त्यांनी कम्युनिस्टांविरुद्ध जिहाद पुकारला. त्यांतील मुख्य इमाम सदसेव यास सरकारने पकडलें तेव्हा अल्लाची कृपा असलेल्या मनुष्याला सरकार पकडूं शकेल, यावर लोकांचा विश्वास बसेना. तेव्हा त्याचा खटला जाहीरपणे चालवून त्याला मृत्युदंड देण्यांत आला. तेव्हा मग जीर्णमतवादी मुस्लिमांना प्रतिकार हळूहळू ओसरू लागला.
 युरोपीय पश्चिम रशियाप्रमाणेच तुर्किस्तानांतहि युद्धकाळांत धर्मविरोधी आघाडी बंद करण्यांत आली होती. मुस्लिमांच्या धर्मभावनांची जपणूक करून, त्यांना युद्धांत सहभागी होण्यास अनुकूल करावें, अने प्रयत्न त्या काळांत सोव्हिएट नेते करीत होते. त्यांना यशही आले होते. पण युद्ध संपल्यानंतर
 इ. वा. २