पान:इहवादी शासन.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८६ । इहवादी शासन
 

जमशेदजी टाटा, दोराब, रतन, जे. डी. आर. टाटा, फेरोजशहा मेथा, मॅडम कामा, खुशीद फ्रामजी नरीमन, डॉ. होमी जहांगीर भाबा, झुबीन मेहेता, जनरल माणेकशा, फरुक इंजिनियर, हीं अगदी वरच्या पातळीवरच्या कर्त्या स्त्री-पुरुषांचीं नांवें आहेत.
 पारशी जमातीमधल्या वर निर्देशिलेल्या श्रेष्ठ स्त्री-पुरुषांपैकी दोघातिघांची चरित्रे तपशिलाने पाहतां, त्या समाजाची इहवादी वृत्ति स्पष्टपणे दिसून येईल. दादाभाई नौरोजी हे प्रथमपासूनच जाती-जमातीय संकुचित वृत्तीपासून मुक्त होते. मंबईला त्यांनी 'स्टुडंटस् लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी'ची स्थापना केली ती सर्व समाजासाठी. केवळ पारशांसाठी नव्हे. म्हणूनच त्याच वेळी मराठी व गुजराती 'ज्ञान प्रसारक मंडळी' या नांवाच्या तिच्या दोन शाखा त्यांनी स्थापन केल्या. त्यांनी मुलींच्या शाळा काढल्या त्या पारशी व मराठी मुलींसाठी. ते इंग्लंडला १८५५ सालीं प्रथम गेले ते कामा घराण्याच्या व्यापारी कंपनीचे भागीदार म्हणून. पण तेथे हिंदी जनतेच्या दुरवस्थेची कहाणी इंग्लिश जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी व्याख्यानें दिलीं व संस्थाहि स्थापन केल्या. इंग्रजी राज्यांत हिंदुस्थान दरिद्री होत चालला आहे; आणि इंग्रज लोक रयतेची लूट करीत आहेत हा टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीचा जो आधारभूत सिद्धान्त तो १८७३ साली 'हिंदुस्थानचें दारिद्र्य' या आपल्या ग्रंथांत प्रथम दादाभाईंनी मांडला. 'स्वराज्यमंत्राचे द्रष्टे', 'आधुनिक भारताचे पितामह' असा दादाभाईंचा गौरव केला जातो तो किती यथार्थ आहे तें यावरून दिसून येईल. आपल्या निःस्वार्थी, सेवामय जीवनाने त्यांनी भारतापुढे एक आदर्शच निर्माण करून ठेवला आहे. जातीयता, अंधश्रद्धा, पूर्वग्रह यांतून ते मुक्त नसते, तर त्यांच्या हातून भारताची ही सेवा घडलीच नव्हती.
 स्वराज्याचा मंत्र प्रथम जसा दादाभाईंनी दिला तसा भारताचा 'वंदे मातरम्' अक्षरांकित तिरंगी राष्ट्रीय ध्वज प्रथम मादाम कामा यांनी उभारला व भारतापुढे दुसरा आदर्श निर्माण करून ठेवला. कामाबाईंचा जन्म १८६१ सालीं झाला. तरुणपणींच त्यांनी राष्ट्रसेवेचें व्रत घेतलें होतें. लग्न झाल्यावर त्यांच्या पतींचा याला विरोध होऊ लागला, पण माझें माझ्या देशकार्याशी आधीच लग्न झालें आहे, असें त्या म्हणत. त्या वेळी त्यांनी स्त्रियांसाठी संस्था स्थापन केल्या त्या हिंदी स्त्रियांसाठी. केवळ पारशी स्त्रियांसाठी नव्हे. त्यांच्या राष्ट्रीय कार्यामुळे त्यांना इंग्रज सरकारने हद्दपार केलें. तेव्हा त्या इंग्लंडला गेल्या. तेथे शामजी कृष्ण वर्मा, वीर सावरकर यांचा सहवास त्यांना लाभला व शामजींप्रमाणें त्याहि भारताच्या दुःस्थितीविषयी हाइडपार्कमध्ये व्याख्याने देऊ लागल्या. त्यामुळे त्यांना इंग्लंड देश सोडावा लागला. मग त्या पॅरिसला जाऊन राहिल्या. तेथे त्या पस्तीस वर्षे होत्या. त्या मुदतींत त्यांचें घर म्हणजे क्रांतिकारकांचें आश्रयस्थान होतें. 'वंदे मातरम्' हें साप्ताहिक त्यांनी लंडनला सुरू केलें होतें. तें पुढे त्या जिनीव्हाहून चालवीत. त्यांत लाला हरदयाळ, वीरेंद्र चट्टोपाध्याय यांचे लेख येत असत. याच काळात १९०७ साली जर्मनीमध्ये