पान:इहवादी शासन.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रमुख धर्मपंथांचें कार्य । २८५
 

पारशी दात्यांनी कधीहि बाळगलेला नाही. ख्रिस्ती समाजाने तो हेतु जाहीरपणें सांगितलेला आहे. लोकसेवा गौण होय, धर्मांतर हेंच अंतिम उद्दिष्ट होय, असें ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जाहीर केल्याचें मागे सांगितलेंच आहे. पारसी धनिक दात्यांच्याविषयी अशी कधी कोणाला शंकाहि आलेली नाही. त्यांनी दानें दिलीं तीं मानवतेच्या बुद्धीने व राष्ट्रीय भावनेने दिलीं हें निर्विवाद आहे. आणि ही त्यांची आजचीच वृत्ति आहे असें नसून, प्रारंभापासूनचीच आहे. अकराव्या-बाराव्या शतकामध्ये त्यांनी असाच दानधर्म केल्याची नोंद त्यांच्या इतिहासांत सापडते.
 प्रारंभीं पारशी शेतकरी होते, पण पुढे हळू हळू ते व्यापारी झाले आणि त्यासाठी अवश्य तें परदेशगमनहि ते करूं लागले. जैन, शीख हे व्यापारी झाले. पण परदेशगमन त्यांनी केलें नाही. वैदिक धर्मापासून ते वेगळे झाले, पण सप्तशृंखला तोडण्याची त्यांना हिंमत झाली नाही. आणि यासाठी हिंदु धर्माच्या वर्चस्वाला ते आज दोष देतात. पण पारशी या वर्चस्वाखाली सापडले नाहीत असें दिसतें. रुस्तुमशेठ माणेकशेठ यांचा मुलगा १७२३ सालींच इंग्लंडला गेला होता. लोवजी नसरवानजी वाडिया (१७००-१७७४) यांनी सिंगापूरला जहाज बांधणीचा कारखाना काढला होता. वाडियांच्या अनेक पुत्रपौत्रांनी मुंबईला गोद्या बांधून जहाजे बांधण्याचा धंदा पुढे चालविला आणि त्यांनी इंग्लिश आरमारालाहि जहाजें पुरविलीं. नेल्सन हा याच जहाजांतून लढाया लढला असें सांगतात. इंग्लिश आरमारी मंत्रालयाने वाडियांचा यासाठी मुक्तकंठाने गौरव केलेला आहे. पारशी जसे आरमारासाठी जहाजे बांधीत तसेच व्यापारी जहाजेंहि बांधीत. आणि त्या स्वतःच्या जहाजांतून चीन देशाशींहि व्यापार करीत. याचा अर्थ असा की, हिंदु समाजाच्या अफाट विस्तारांत राहूनहि पारशी कूपमंडूक झाले नाहीत. १६६८ साली पोर्तुगालने मुंबई बंदर इंग्रजांना दिलें. तेव्हापासून पारशी लोक बहुसंख्येने मुंबईत राहूं लागले. त्यामुळे त्यांना इंग्रजांशीं व पाश्चात्त्य जगाशीं चांगला संबंध ठेवतां आला व पाश्चात्त्य विद्येचे संस्कारहि त्यांच्यावर होऊं लागले. या संधीचा फायदा घेऊन अनेक पारशी इंग्लिश, फ्रेंच या भाषा शिकले व त्या मार्गाने त्यांनी पाश्चात्त्य विद्याहि स्वीकारली. याचाच सुपरिणाम होऊन पारशांमध्ये अनेक कर्तृत्वशाली स्त्री-पुरुष निर्माण झाले.
 १९ व्या शतकांत मुंबईची जी वाढ झाली तिचें बरेंचसें श्रेय पारशी समाजाला आहे. १९२५ साली ज्ञानकोशकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे साक्षरतेचें व इंग्रजी भाषा जाणणाऱ्यांचें प्रमाण पारशांत सर्वांत जास्त होतें. स्त्रीशिक्षणाचा प्रसारहि त्याच जमातींत जास्त होता. बी. ए., एम. ए., एम. डी. झालेल्या अनेक स्त्रिया पारशांत तेव्हा होत्या. एकंदर पारशी समाजांत डॉक्टर, वकील, इंजिनियर, सरकारी अधिकारी, व्यापारी, कारखानदार, शास्त्रज्ञ यांचें प्रमाण मोठें आहे. भारतांत आज एकंदर १ लक्ष २५,००० एवढीच पारशांची संख्या आहे. या लोकसंख्येच्या मानाने त्यांच्यांतील कर्तृत्व किती मोठें आहे पाहा. दादाभाई नौरोजी, जमशेदजी जिजीभाई,