पान:इहवादी शासन.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रमुख धर्मपंथांचें कार्य । २८३
 

डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने भारतांतील अनेक अस्पृष्य जातींनी- प्रामुख्याने महार जमातीने बौद्धधर्माचा स्वीकार केला आहे. आणि अजूनहि तसें धर्मांतर होत असल्याच्या वार्ता अधूनमधून येतात. या घटनेला चौदा-पंधरा वर्षेच झालीं असल्याने नवबौद्धांनी काय साधलें हे सांगण्याची वेळ अजून आलेली नाही. पण अजूनहि त्यांची अस्पृश्यता नष्ट झालेली नाही आणि जातिभेद मुळीच कमी झालेले नाहीत एवढें खरें. आंतरजातीय विवाहावांचून सुधारणा होणार नाही असें डॉ. आंबेडकर म्हणत असत. पण महार, मांग, चांभार यांच्यांत तसे विवाह अजूनहि घडत नाहीत. इतकेंच काय, पण त्यांच्या पोटजातींतहि होत नाहीत.
 या सगळ्याचा भावार्थ असा की, बौद्ध, जैन व शीख हे हिंदु समाजापासून फुटून निघून त्यांनी आपले स्वतंत्र पंथ स्थापिले असले, तरी इहवादाच्या दृष्टीने ते हिंदूंपेक्षा जास्त प्रगत झालेले नाहीत. मात्र हेंहि तितकेंच खरें की, हिंदु समाजाच्या धुरीणांप्रमाणे त्या पंथाचे धुरीणहि स्वसमाजावर पाश्चात्त्य विद्येचे संस्कार करून इहवादाचीं तत्त्वें तेथे दृढमूल करण्याचा यावत्-शक्य सर्व प्रयत्न करीत आहेत. कारण पंथभेद असला तरी त्यांना भारताच्या उत्कर्षाची हिंदूइतकीच चिंता आहे.
 यशाच्या दृष्टीने पाहिलें तर असें वाटतें की, हिंदु समाजाला तरी इहवादाचे संस्कार व्यापक प्रमाणावर दृढमूल करून टाकण्यांत मोठें स्पृहणीय यश कोठे आलेलें आहे? गेल्या शंभर-दीडशे वर्षांत प्रगति बरीच झालेली असली, तरी अजून अंतिम उद्दिष्ट फार दूर आहे. चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, ग्रंथप्रामाण्य, परिवर्तनविरोध यांचा प्रभाव अजून इतका आहे की, हे सर्व दोष समूळ नष्ट होऊन हिंदु समाज पूर्ण एकसंध व संघटित होण्याविषयी केव्हा केव्हा निराशा वाटू लागते. तीच स्थिति या पंथांची आहे. पण अंतिम उद्दिष्ट तें आहे व त्या मार्गाने जाऊन समता, स्वातंत्र्य, विज्ञानवृत्ति, बुद्धिप्रामाण्य यांचे संस्कार करून लोकशाही व राष्ट्रनिष्ठा यांचीं मूलतत्त्वें स्वसमाजांत रुजवावयाचीं याविषयी त्यांच्यांत दुमत नाही. म्हणून पंथभेद कायम राखावयाचा असला, तरी त्यावर भर न देतां ऐक्यवृत्तीवर भर देऊन सर्वांनी संघटित व्हावयाचें ठरविलें तर प्रगतीचा मार्ग बराच सुगम होईल.


 बौद्ध, जैन व शीख यांचा इहवादाच्या दृष्टीने विचार झाला. आता याच दृष्टीने पारशी पंथाचा विचार करावयाचा आहे. झरतुष्ट्री पंथ असें या पंथाचें मूळ नांव आहे. त्याचा मूळ प्रणेता जो झरतुष्ट्र त्याच्यावरून हें नांव पडलेलें आहे. या पंथाच्या अनुयायांचें 'पारशी' असें नांव भारतांत रूढ झालेले आहे.
 हा पंथ हिंदु धर्मांतला पंथ नाही. जैन बौद्धांप्रमाणे या पंथाचे लोक आपल्याला केव्हाहि हिंदु म्हणवीत नव्हते. ते मूळचे हिंदुस्थानांतलेहि नाहीत. इसवी सनाच्या सातव्या शतकांत इराण या त्यांच्या मायभूमीवर मक्केला नवीनच प्रस्थापित झालेल्या