पान:इहवादी शासन.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८२ । इहवादी शासन
 

पण त्यांच्या काळी भारतांत पाश्चात्त्य विद्या प्रविष्ट झाली असूनहि शीख पंडितांनी तिचा प्रसार पंजाबांत केला नाही. त्यामुळे रणजितसिंगानंतर सर्व प्रकारचे भेद चेकाळून शीख पराभूत झाले.
 अर्वाचीन काळांत हिंदूंप्रमाणेच शिखांवरहि पाश्चात्त्य विद्येचे संस्कार होऊन लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, विज्ञानदृष्टि या तत्त्वांचा त्यांनी अवलंब केला. स्वातंत्र्य- लढ्यांत प्रथम गदर पक्ष स्थापून आणि नंतर क्रांतिकारकांत सामील होऊन शीखांनी जें आत्मबलिदान केलें त्याला तर तोडच नाही. त्यांची लोकसंख्या भारतांत एक टक्का आहे. पण वधस्तंभावर चढलेल्यांत शीख क्रांतिकारकांचें प्रमाण पन्नास टक्के आहे असें सतीन्द्रसिंग यांनी म्हटलें आहे. (इलस्ट्रेटेड वीकली, २३।११।६९.) पण असें असूनहि शीख थोर संघटनाकुशल असा राजकीय नेता निर्माण करू शकत नाहीत. कारण शीखसमाज अजूनहि पुराणमतवादी अंधश्रद्धा जथेदारांच्या व 'मास्टरां'च्या अधीन आहे.
 शिरोमणि गुरुद्वारप्रबंधक समिति ही या जथेदारांच्या व मास्टरांच्याच ताब्यांत असून त्यांचें उत्पन्न कोट्यवधि रुपये आहे. यामुळे शीखसमाज अंध व पुराणवादी राहणें त्यांच्या हिताचें आहे. 'इलस्ट्रेटेड वीकली'च्या त्याच अंकांत श्रीमती इंदिरा रंधवा यांनी 'शीखांतील जातिसंस्था' या आपल्या लेखांत शीखांत जैनांप्रमाणेच तीव्र जातिभेद असल्याचें सांगून त्या जातिसंस्थेचें वर्णनहि केलें आहे. त्या म्हणतात, "सर्व गुरूंचा जातिभेदाला विरोध असूनही एकाहि गुरूने आपल्या जातीबाहेर लग्न केलें नाही. ते सर्वं क्षत्रिय होते. त्यांनी सर्वांनी क्षत्रिय स्त्रियाच केल्या. शीखांत जाट- शीख, हिंदु-शीख व अस्पृश्य हे भेद कायमच आहेत. जाट हे शीखेतर जाटांशी लग्न करतील, पण शीख जाटेतरांशी करणार नाहीत. मझावी हे शीखांतील अस्पृश्य असून त्यांच्यांतहि चांभार, चुव्रा, इ. जाति आहेत. हे मझावी मोठे पराक्रमी आहेत, पण त्यांची अस्पृश्यता जात नाही. कित्येक खेड्यांत त्यांचीं गुरुद्वारें व विहिरी निराळ्या आहेत. आणि शहरांत गुरुद्वारें एक असली तरी त्यांच्या हातचा प्रसाद कोणी घेणार नाही. शीखांत जातिभेद तसेच राहण्याचें कारण म्हणजे हिंदु परंपरेचें वर्चस्व होय."
 वर निर्देशिलेले लेखक डॉ. प्रा. संगवे यांनीहि तसेंच म्हटलें आहे. शीख, बौद्ध, जैन हे सर्वच आपण जातिभेद निर्मूलन करूं शकलो नाही, याचें अपश्रेय हिंदु परंपरेच्या वर्चस्वालाच देतात. पण यावरून त्यांना हिंदु समाजामध्ये कसलीहि क्रांति करतां आली नाही हेंच उघड होते. तेव्हा फुटून निघालेल्या शीखसमाजालाहि इहवादाच्या दृष्टीने निराळें असें स्थान नाही.

जातिभेद कायमच

 बौद्ध धर्माने प्राचीन काळी काय कार्य केलें तें वर सांगितलेंच आहे. इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत भारतांतून बौद्ध धर्म समूळ नाहीसा झाला. त्यानंतर