पान:इहवादी शासन.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुख धर्मपंथांचें कार्य । २८१
 

जैनसमाजांत दृढमूल असून अखिल भारतांतील या समाजाच्या त्यामुळे अगदी हवाबंद चिरफळ्या झालेल्या आहेत.
 स्त्री-जीवनाच्या दृष्टीने विचार करतां जैन समाज अजूनहि बराच मागासलेला आहे. बालविवाह बराच रूढ असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा प्रसार व्हावा तसा झालेला नाही. आणि मुख्य म्हणजे विधवांचें प्रमाण जैन समाजांत फार मोठें आहे. कांही जातींत विधवा-विवाह मान्य आहे. पण असा विवाह मान्य नसलेल्या जाति या जातींना हीन लेखतात. त्यामुळे जाति- जातींतला दुरावा आणखी वाढतो. बाल-विवाह आणि विधवाविवाह निषेध यांमुळे जैन समाजाची लोकसंख्या घटत आहे, याची चिंता त्या समाजाच्या धुरीणांना वाटत आहे.
 हें सर्व पाहतां असें दिसतें की, अंधश्रद्धा, शब्दप्रामाण्य, रूढीचें प्राबल्य, कर्मकांड, जातीयता, भेदप्रवृत्ति हीं इहवादाला अत्यंत मारक असलेलीं जीं तत्त्वें त्यांचें वर्चस्व जैनांवर हिंदूंच्या इतकेंच आहे. लेखक डॉ. संगवे यांनी गेली दोन हजार वर्षे जैन समाजाचें जें अधोगमन चालू आहे त्याला कारण भोवतालच्या हिंदु समाजाचें प्रबळ वर्चस्व हे होय असें म्हटलें आहे. याचा अर्थ असा की, जैन- धुरीण कसलीहि क्रांति करूं शकलेले नाहीत.

शिखांची भूमिका

 शिखांच्या इतिहासाची रूपरेखा अशीच आहे. प्रारंभीच्या काळांत गुरु नानक यांच्यापासून गुरु गोविंदसिंगांपर्यंत बहुतेक सर्व गुरूंनी इहवादाचीं बहुतेक सर्व तत्त्वें उपदेशिलीं व आचरलीं होतीं. गुरु नानक अखेरपर्यंत स्वतःला हिंदूच म्हणवीत; पण त्यांनी वेदप्रामाण्य मानले नाही व आपल्या बुद्धीने स्वतंत्र धर्म-तत्त्वांचा उपदेश केला. एकत्र रसोई निर्माण करून त्यांच्या लंगरांत सर्व जातींच्या व धर्मांच्या अनुयायांना एकत्र खानपान घडविलें. निवृत्तिवादाचा कडक शब्दांत निषेध केला व कर्मकांडाचें प्राधान्य नष्ट केलें. स्वत: परदेशगमन करून ती पांचशे वर्षांची हिंदूंच्या पायांतील शृंखला तोडून टाकली. गुरु गोविंदसिंग यांनी जातपात, शिखासूत्र, उच्चनीचता पाळणारा जो धर्म तो धर्मच नव्हे असें सांगितलें. आपापल्या मताप्रमाणे प्रत्येक शीख गुरु धर्मांत सुधारणा करीत गेले, यावरून धर्माची परिवर्तनीयता त्यांना मान्य होती हे उघडच आहे.
 अशा इहवादी तत्त्वांच्या अवलंबनामुळेच शीख समाज संघटित झाला व मोठे पराक्रम करूं शकला. पण हें पुढे टिकलें नाही. जैनांप्रमाणेच या एका पंथाच्या अंतरांत अनेक भेद निर्माण झाले. ग्रंथसाहेब वेदांच्या ठायीं येऊन बुद्धिप्रामाण्य नष्ट झालें. परदेश-गमनबंदी म्हणजे सिंधु-बंदी ही शृंखला पुन्हा स्वहस्तानेच शिखांनी आपल्या पायांत टोकून घेतली आणि जातीय व पंथीय भेदांमुळे शीख समाज भग्न होऊन गेला. महाराज रणजितसिंग यांनी शिखांची एकजूट करून तीस वर्षांत पंजाब स्वतंत्र केला.