पान:इहवादी शासन.pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८० । इहवादी शासन
 

परदेशगमन थांबलें आणि धर्मांतील जड कर्मकांडाला फार महत्त्व आलें. दुर्दैव असें की, हे सगळे दोष जसेच्या तसे, किंबहुना कांही अधिकच प्रमाणांत जैन पंथांत त्या वेळीं होते. प्रारंभीच्या काळांतल्या त्यांच्यांतील पुरोगामी क्रांतिप्रवृत्ति संपूर्ण नष्ट होऊन हिंदुधर्माप्रमाणेच त्यांच्यांतील इहवादी तत्त्वांचा शून्याकार झाला होता.
 त्यानंतर आजच्या जैन समाजाचें स्वरूप पाहिलें पाहिजे. इंग्रजांचें राज्य येथे प्रस्थापित झाल्यानंतर भारतांत पाश्चात्त्य विद्या आली. आणि येथे प्रबोधनयुगाला प्रारंभ झाला. त्याचे संस्कार कमीअधिक प्रमाणांत सर्वच समाजावर झाले तसे जैनांवरहि झाले. त्यामुळे हिंदूप्रमाणेच जैनहि हळूहळू इहवादाच्या कांही तत्त्वांचा अवलंब करूं लागले व त्यामानाने त्यांचें पाऊलहि प्रगतिपथावर पडूं लागलें. त्या इहवादाच्या दृष्टीने आजच्या जैन समाजाचा अभ्यास करतां असें दिसतें की, हिंदु समाज जितका व ज्या प्रमाणांत प्रगत किंवा अप्रगत आहे तितकाच जैनसमाजहि प्रगत किंवा अप्रगत आहे.

प्रा. संगवे यांचें प्रतिपादन

 प्रा. विलास आदिनाथ संगवे यांनी 'जैन कम्युनिटी: ए सोशल सर्व्हे' असा ग्रंथ लिहिला आहे. यावरून आजच्या जैन समाजाचें रूप पुढीलप्रमाणे दिसतें. जैन धर्मांत ऐक्यभावना अशी नाहीच. उलट अत्यंत क्षुद्र मतभेदांना महत्त्व देऊन समाजाचीं शकलें करण्याची प्रवृत्ति दिवसेदिवस वाढतच आहे. दोन हजार वर्षांत हे भेद नष्ट करून जैनसमाज संघटित करील असा एकहि पुरुष या समाजांत झाला नाही. श्वेतांवर व दिगंबर असे जैनांचे प्रमुख भेद आहेत व वस्त्रे नेसावीं की नग्न राहावें, स्त्री मोक्षाधिकारी आहे की नाही, एवढेच त्यांच्यांत वादविषय आहेत. या दोन उपपंथांत पुन्हा अनेक भेद असून अंगावरच्या माशा निवारण्यास झटकणें वापरावयाचें तें मोरपिसांचें असावें की गाईच्या शेपटीच्या केसांचें असावें, की कांहीच घेऊ नये, असल्या क्षुद्र कारणांवरून ते भेद निर्माण झालेले आहेत. पण त्या लोकांच्या मतें त्यांना महत्त्व इतकें आहे की, दुसरे दोन पंथ जैन नव्हेतच असें प्रत्येक पंथ म्हणतो.
 जातिभेदाच्या दृष्टीनेहि हिंदूंपेक्षा जैनांची स्थिति निराळी नाही. दिगंबर पंथांत ८७ जाति-उपजाति असून, श्वेतांबरांत ३८ जाति आहेत. यांतील कांही जातींची लोकसंख्या शंभराच्या आंतच असल्यामुळे त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्यांच्यांत बेटीबंदी रूढ आहे. जातिजातींत उच्चनीच भाव हिंदूंप्रमाणे जारी असून बेटीबंदीप्रमाणेच रोटीबंदीहि या जातींत जारी आहे. एका जातीच्या जेवणावळीला दुसऱ्या जातीला निमंत्रणहि नसतें. जैनांमध्ये क्षत्रियांना ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ मानतात. आणि या उच्चनीच भावनेमुळे व्यवसायबंदीहि या पंथांत रूढ झाली आहे. कोणत्याहि जातीने कोणताहि धंदा करावा हें चालणार नाही. सारांश असा की, जातिभेद हा