पान:इहवादी शासन.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७८ । इहवादी शासन
 

हिंदु समाजाहुन यांचा निराळा विचार करण्याचें कारण एवढेच की, हिंदु जीवनाच्या मूळ प्रवाहांतून हे पंथ आरंभापासून पृथक् झाले आहेत. गतिहीन, प्रतिगामी, होऊन बसलेल्या वैदिक समाजांत आम्हीं क्रांति घडविली आहे असें त्यांचें म्हणणें आहे; आणि आजहि आम्ही निराळे आहों, आमचा धर्म हिंदु धर्माचा एक पंथ नसून तो स्वतंत्र धर्म आहे, असा आग्रह या पंथांतले लोक धरतात. आता ते स्वतःला पृथक् म्हणवितात. तेव्हा इहवादाच्या दृष्टीने त्यांनी भारताला काय देणें दिलें त्याचा विचार करणें अवश्य आहे.

विषमतेविरुद्ध बंड

 जैन आणि बौद्ध हे पंथ भारतांत इ. पू. सहाव्या शतकांत उदयाला आले. वैदिक धर्मांतील चातुर्वर्ण्य, त्यांतील विषमता, त्यांतील ब्राह्मणांचें श्रेष्ठत्व आणि यज्ञयागांतील कर्मकांड व हिंसा या तत्त्वांविरुद्ध आचारांविरुद्ध जैन व बौद्ध धर्मांचे संस्थापक, भगवान् महावीर व भगवान् गौतमबुद्ध हे बंड करून उठले असें सांगितलें जातें. हीं सर्वं तत्त्वें व आचार इहवादाला मारक आहेत यांत शंकाच नाही. पण प्राचीन इतिहासाचें आज जें संशोधन झाले आहे त्याअन्वये पाहतां या तत्त्वांविरुद्ध वैदिक धर्मीयांनी जैन-बौद्धांच्या पूर्वीच बंड उभारलें होतें.
 उपनिषदांत व गीतेंत कर्मकांडप्रधान हिंसात्मक धर्माची स्पष्टपणें निर्भर्त्सना केलेली आढळते. या दोन्ही ग्रंथांच्या प्रणेत्यांनी ज्ञानयज्ञाचा, भक्तीचा व निष्काम कर्माचा आग्रहाने पुरस्कार केलेला आढळतो. जें यज्ञयागाचें तेंच चातुर्वर्ण्याचें व तज्जन्य विषमतेचें. प्राचीन काळी वैदिक धर्मांत चातुर्वर्ण्य होतें तें गुणकर्मसिद्ध होतें. गीतेंत व उपनिषदांत त्याचेंच प्रतिपादन आहे. आणि पुढे चातुर्वर्ण्य जन्मसिद्ध ठरूं लागलें, तरी इसवी सनाच्या दहाव्या शतकांपर्यंत हिंदूंमध्ये अनुलोम विवाह व कांही प्रमाणांत प्रतिलोमहि चालू होते. पं. सातवळेकर, डॉ. काणे, चिंतामणराव वैद्य, कै. डॉ. मनशी यांनी हें निर्विवाद सिद्ध केलें आहे.
 आता याहून निराळें असें कांही, जास्त पुरोगामी, समतेला जास्त पोषक असें जैन व बौद्ध पंथांनी सांगितलें व घडविलें आहे काय, असा प्रश्न आहे. तसें त्यांनी कांही केलें असल्याचा कसलाहि पुरावा आज उपलब्ध नाही. बौद्ध पंथाविषयी वोलावयाचें तर सगळा पुरावा उलटच आहे. 'बुद्धकालीन भारतीय समाज' हा रिचर्ड फिक् यांचा ग्रंथ पाहा. (मराठी भाषांतर- कालेलकर) त्यांनी म्हटलें आहे की "बौद्ध धर्माने जातिभेदाचा नाश तर केलाच नाही, पण जातिभेदाच्या प्रसृत होणाऱ्या तत्त्वांना आळा घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही" (पृ. २७६). जातकांतील शेकडो वचनें देऊन फिक् यांनी हें दाखवून दिले आहे की, "बौद्ध धर्माने क्षत्रियांना ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यापलीकडे कांही केलेलें नाही. भिक्षु वर्गाच्या हृदयांतली जातिभेदाची भावना सदैव जागृत होती. (पृष्ठ ६).