पान:इहवादी शासन.pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रमुख धर्मपंथांचें कार्य



 आता भारतांतील कांही प्रमुख धर्मपंथांचा इहवादाच्या दृष्टीने विचार करावयाचा आहे. जैन, बौद्ध व शीख व झरतुष्ट्री (पारशी) हे ते पंथ होत. पहिल्या तीन पंथांचे लोक हिंदु आहेत की नाही, याविषयी वाद आहे. भारतीय घटनेने त्यांचा हिंदूंत समावेश केलेला आहे. गेली चार-पांच वर्षे विश्व हिंदुपरिषद् ही संस्था सर्व हिंदु समाजाच्या संघटनेचा प्रयत्न करीत आहे. तिला या तीनहि पंथांच्या नेत्यांचें सहकार्य लाभलें आहे. आम्ही हिंदूच आहों, असें मान्य करून परिषदेच्या व्यासपीठावर या पंथांचे कांही नेते उपस्थित राहतात व त्या अर्थाचीं भाषणेंहि करतात.
 तथापि या तीनहि समाजांत "आम्ही हिंदु नाही, आमचा धर्म स्वतंत्र आहे" असें म्हणणाराहि एक वर्ग आहे. या पंथांच्या मूळ मतभेदांचा विचार येथे अप्रस्तुत आहे. पृथक्पणाच्या भावनेमुळे इहवादाच्या दृष्टीने या पंथांनी भारतांत कोणतें कार्य केलें, एवढ्यापुरताच येथे विचार करावयाचा आहे.
 हा विचार करण्याआधी एक गोष्ट स्पष्टपणें ध्यानांत ठेवली पाहिजे की, या पंथांतले स्वतःला हिंदु म्हणविणारे किंवा न म्हणविणारे कोणतेहि लोक असोत, ते सर्व पूणपणें भारतीय आहेत. हिंदूंची राष्ट्रनिष्ठा, हिंदूंची भारतभक्ति, हिंदूंचा या भूमीचा अभिमान जितका अस्सल, अव्वल आणि विशुद्ध आहे तितकीच त्यांचीहि निष्ठा, भक्ति व अभिमान विशुद्ध आहे. या भूमीची हिंदूंनी जशी सेवा केली आहे, तिच्यासाठी त्याग केला आहे, तिच्या हिताची चिंता वाहिली आहे तशीच किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणांत क्वचित अधिकहि चिंता या पंथांनी वाहिली आहे.
 प्राचीन काळांत राजकीय नेतृत्व, धर्मसेवा, व्यापार, धनोत्पादन, काव्य, नृत्य, संगीत, शिल्प, रसायन, ज्योतिष, वैद्यक इत्यादि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत बौद्ध व जैन यांनी भरतभूमीच्या वैभवांत भर घातलेली आहे. अर्वाचीन काळांतहि या पंथांचे अनुयायी अनेक क्षेत्रांत मायभूमीची सेवा करीत आहेत. असें असतांना एकंदर