पान:इहवादी शासन.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६ । इहवादी शासन
 

होता, तुर्कस्थानचा स्वातंत्र्यवीर होता. पण त्याच्या सुधारणांना सुद्धा तुर्कस्थानांत असाच प्रतिकार झाला. रशियन तुर्किस्तानांत तर कम्युनिस्ट हे अगदी परके व उपरे असेच होते.
 १९२७ सालीं तुर्किस्तानांत कम्युनिस्टांनी स्त्रीबंधविमोचनाची चळवळ सुरू केली. तिला 'हदजुम' (चढाई) असें म्हणत. बुरखा नष्ट करणें हें तिचें पहिलें लक्ष्य होतें. त्या सालीं ८ मार्चला जागतिक स्त्रीदिन होता. त्या दिवशी सर्व तुर्किस्तानांत शेकडो सभा घेण्यांत आल्या. त्या सभांना सर्व मिळून लक्षावधि स्त्रिया उपस्थित राहिल्या. एकट्या उझबेकिस्तानांत एक लक्ष स्त्रियांनी बुरखा काढून टाकून त्याचें दहन केलें. त्यांतील बहुसंख्य स्त्रियांनी घरी गेल्यावर पुन्हा बुरखा घेतला, पण त्या सभांमुळे मुस्लिम समाज भडकून गेला व त्याने दहा-पांच दिवसांत बुरखा टाकणाऱ्या चौदा स्त्रियांचे खून केले. पुढल्या वर्षी ८ मार्च या दिवशी हाच प्रकार झाला. त्या साली २०० स्त्रियांचे खून झाले. पण आता स्त्रिया निर्भय होत चालल्या होत्या. सोव्हिएट शासनाचा त्यांना पाठिंबा होता. त्याने खुनी लोक शोधून काढून त्यांना भराभर फासावर चढविलें तेव्हा स्त्रीविमोचनाची चळवळ पसरू लागली. मुस्लिम स्त्रिया पडद्यांतून बाहेर तर आल्याच, पण आता त्या ग्रामपंचायतीच्या सभासदहि होऊं लागल्या आणि अशा रीतीने कम्युनिस्ट सोव्हिएट शासनाच्या पक्षांत त्या पूर्ण सामील झाल्या. वष्किरिया, तार्तरिया या प्रदेशांत बुरखा तितकासा रूढ नव्हता. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या प्रदेशांत बुरखा काढणें म्हणजे इस्लामचा नाश होय, असें मुल्लामौलवींना वाटे. पण वरील प्रदेशांत तशी भावना नव्हती. तेथील मुल्लांनी बुरखा असू नये अशी इस्लामचीच आज्ञा आहे, असा निर्णय दिला. त्यामुळे तेथे फारसे अत्याचार झाले नाहीत. इतकेंच नव्हे, तर स्त्रियांना तेथे मशिदींतहि प्रवेश मिळू लागला व गावकारभारांतहि त्यांना सुखाने सहभागी होतां येऊ लागलें. यामुळे स्त्रीदास्य-विमोचनाच्या चळवळीस हळूहळू यश येऊं लागलें. अर्थात् तें एकदम आलें किंवा त्याचें मार्गक्रमण सुखाने झालें असें नाही. उझबेकिस्तान, तुर्कमेनिया या प्रांतांतून पुरुष आपल्या स्त्रियांना सक्तीने बुरखा घालण्यास भाग पाडतात, अशा तक्रारी बरेच दिवस येत राहिल्या. अगदी १९३९ साली बुरखा टाकल्याबद्दल दहा स्त्रियांचे खून पडले आणि रफियेवा या स्त्रीचा खून तर तिच्या नवऱ्यानेच केला. पण हे सर्वच प्रकार हळूहळू बंद पडून आता सोव्हिएट रशियांतील मुस्लिम स्त्री बव्हंशी पुराण- बंधनांतून मुक्त झाली आहे.

अरबीऐवजी लॅटिन

 शरियत हा मुस्लिमांचा धर्माधिष्ठित असा कायदा आहे. त्यांत एक अक्षराचाहि बदल झालेला चालणार नाही, अशी कडव्या सनातनी मुस्लिमांची प्रतिज्ञा