पान:इहवादी शासन.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७६ । इहवादी शासन
 

सतत चालली आहेत. या ख्रिस्तीकरणाच्या व्यवहाराशीं मी स्वतः गेली पंचवीस वर्षे झगडत असून, या काळांत ख्रिस्ती झाल्यामुळे इतस्ततः उद्ध्वस्त स्थितींत काळ कंठीत असलेल्या सात सहस्र हरिजनांना परत हिंदु धर्मांत आणले आहे. आपले लोक या विषयांत अज्ञानी आहेत. एका पक्षी कांही सामाजिक अन्यायामुळे आणि दुसऱ्या पक्षी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी दाखविलेल्या विलोभनामुळे बळी पडून हिंदु धर्म सोडण्यास ते तयार होतात."

कणखर कृतीचा अभाव

 मंत्रिमहाशयांच्या भाषणांत मिशनऱ्यांचें सारार्थाने सर्व वर्णन आले आहे. मिशनरी विलोभने दाखवून धर्मांतर घडवितात, आणि धर्मांतरितांचें जीवन धर्मांतर केल्यानंतरहि हीन-दीन असेंच राहतें. त्यांच्यावरील सामाजिक अन्याय दूर होत नाहीत असें स्वच्छ दिसत असूनहि धर्मांतरावर बंदी घालण्याचा कायदा करण्याचा प्रयत्न जगजीवनराम करीत नाहीत.
 पण काँग्रेसच्या नेत्यांकडून यापेक्षा कांही निराळी अपेक्षा करण्यांत अर्थ नाही. मतासाठी, सत्तेसाठी, परदेशांतून मिळणाऱ्या पैशासाठी लाचार व ध्येयशून्य नि तत्त्वशून्य झालेली अशी ती एक संस्था आहे. हें तिच्या नेत्यांनीच वेळोवेळीं सांगितलें आहे. तेव्हा राष्ट्रीय मुस्लिमांप्रमाणेच ती राष्ट्रनिष्ठ ख्रिश्चन समाजाची उपेक्षा करणार, त्याच्यावर धार धरणार यांत कांही नवल नाही. पण या राष्ट्राची चिंता वाहणाऱ्या हिंदु संस्थांनी या समाजाची उपेक्षा करणें अक्षम्य ठरेल.
 या भूमीला मातृभूमि मानणारा, या भूमीच्या प्राचीन परंपरेचा आत्मीयतेने अभिमान बाळगणारा, तिच्या थोर सुपुत्रांना भक्तीने वंदन करणारा व तिच्या उत्कर्षासाठी वाटेल त्या त्यागाला सिद्ध असणारा जो समाज तो कोणत्याह धर्माचा असला तरी तो स्वकीयच आहे, ही भूमिका हिंदुसमाजाने घेतली पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा ती घेतली होती. तेव्हा ती भारताच्या हिताची असणार यांत शंका नाही. पण तशी भूमिका घ्यावयाची तर हिंदु समाज स्वातंत्र्यवीरांइतकाच इहवादी होणें अवश्य आहे. हें त्याला पेलेल काय ?