पान:इहवादी शासन.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७४ । इहवादी शासन
 

तरी ते हिंदु संस्कृतीचे प्रखर अभिमानी होते. मस्कारेन्हस म्हणत, "'इंडियन' याचा अर्थ मी 'हिंदु' असाच लावतों व मला त्याचा अभिमान आहे."
 रे. ना. वा. टिळक यांची अशीच भूमिका होती. वेदांचा ते जुना करार म्हणून आदर करीत. "ख्रिस्त यशोरत झालों तरी, ख्रिस्ती झालो तरी, माझ्या जन्मधरेसाठी मी मृत्यु पत्करीन" असें एका कवितेंत त्यांनी म्हटलें आहे. त्यांचे चिरंजीव देवदत्त यांनी धर्मांतर म्हणजे संस्कृत्यंतर किंवा समाजांतर नव्हे. धर्मांतरानंतरहि मनुष्य संस्कृतीने हिंदु राहूं शकतो अशा शब्दांत वडिलांच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुराष्ट्रवादी सावरकर यांनी मायकेल मधुसूदन दत्त या बंगाली राष्ट्रीय ख्रिस्ती कवीचा उल्लेख करून माणसाने धर्मांतर केल्यानंतरहि तो संस्कृतीने हिंदु राहूं शकतो या मताला पुष्टी दिली आहे. (ग. त्र्यं. माडखोलकर, तरुण भारत दि. ५-४-१९६२).
 मसुराश्रमाचे संचालक हे कडवे हिंदुराष्ट्रवादी आहेत. पण त्यांचीहि हिंदुत्वाची व्याख्या वरीलप्रमाणेच व्यापक आहे असें दिसतें. 'इंडियन नॅशनल चर्च'शीं त्यांनी दृढ स्नेहसंबंध प्रस्थापित केले असून, त्या चर्चच्या चालकांविषयी ते अतिशय आदराने लिहितात. वरील ख्रिश्चन संस्था या वीर सावरकरांच्या स्मृतीला भक्तीने वंदन करतात. मसुराश्रमाला लिहिलेल्या एका पत्रांत नॅशनल चर्चचे आर्चबिशप विल्यम्स लिहितात, "महामना वीर सावरकरांच्या स्मृतीला आम्ही या चर्चचे सभासद वंदन करतो. आपल्या भारतमातेचे ते थोर सुपुत्र होते. ते कडवे हिंदु असले तरी आपल्या शौर्यधैर्यादि गुणांनी व ख्राइस्टसारख्या चारित्र्याने ते आम्हा राष्ट्रीय ख्रिश्चनांचे सदैव स्फूर्तिस्थान झालेले आहेत. परकी वर्चस्वाविरुद्ध आम्ही जो लढा चालविला त्यामुळे आपले पूज्य नेते वीर सावरकर यांच्या आत्म्याला शांति मिळेल अशी आमची खात्री आहे." (मसुराश्रमपत्रिका, जून १९७०).
 त्रिवेंद्रमचे आर्च बिशप बेनेडिक्ट ग्रेगोरियस हे पूर्वीचे केरळांतील इझावा या अस्पृश्य जमातीचे गृहस्थ. त्यांनी गेल्या वर्षी शिवगिरीला जाऊन हिंदु साधुपुरुष नारायण गुरु यांच्या समाधीची हिंदु पद्धतीने पूजा केली. त्या वेळी ते म्हणाले, "शिवगिरीची यात्रा म्हणजे सत्य, ज्ञान व मुक्ति यांचीच यात्रा होय." नारायण गुरु जरी इझावा जातीचे असले, तरी ते केवळ एक कोटि इझावांनाच वंद्य नसून अखिल हिंदु समाजाला वंद्य आहेत. भारतीयत्व याचा हा असा अर्थ आहे.
 शेवटी एका प्रश्नाची चर्चा करून हें भारतीय ख्रिश्चन समाजाविषयीचें विवेचन पुरें करूं. हे जे भारतनिष्ठ राष्ट्रीय ख्रिश्चन त्यांना भारत सरकार (काँग्रेस नेते) इतर अराष्ट्रीय, बाह्यनिष्ठ ख्रिश्चन समाजापेक्षा जास्त आपुलकीने, आदराने वागवतें काय? नाही. बरोबर उलट स्थिति आहे. मुस्लिमांच्या बाबतींत स्वातंत्र्यापूर्वी व नंतरहि काँग्रेस नेत्यांची जी दृष्टि होती तीच ख्रिश्चनांच्या बाबतींत आहे. अराष्ट्रीय, देशद्रोही, धर्मांध, लीगवादी जे मुस्लिम ते काँग्रेसला जवळचे व जे राष्ट्र-