पान:इहवादी शासन.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २७३
 

तुमच्या धार्मिक कायद्यान्वये आम्ही पाखंडी आहोंत. तेव्हा आम्हांला आपण काय शिक्षा करणार आहांत तें कळवावें. तुमच्या व तुमच्या सहकाऱ्यांच्या कृपेने आमचा पोलिस-स्टेशनमध्ये व न्यायालयांत खूप छळ झाला आहे. पण ध्यानांत ठेवा, शेवटीं प्रभु येशूच्या कृपेने आम्ही यशस्वी झालों. म्हणून पुन्हा सांगतों आम्ही प्रथम भारतीय आहों आणि अंतींहि भारतीयच आहों !" (मसुराश्रमपत्रिका, मे १९६८).

परंपरेचा अभिमान

 आम्ही भारतीय आहों, असें जे ख्रिश्चन म्हणतात त्यांच्या मनांत काय अभिप्रेत असतें ? ते भारतीय परंपरेचा अभिमान बाळगतात, भारतीयांच्या सुखदुःखाशीं एकरूप होतात आणि भारतासाठी कोणत्याहि अंतिम त्यागासाठी सदैव सिद्ध असतात. डॉ. फ्रॅन्सिस्को लुई गोम्स (१८२९-६९) याचें उदाहरण पाहा. हे पोर्तुगीज पार्लमेंटचे पहिले हिंदी सभासद होते. अर्थशास्त्र, भाषाशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ असून कादंबरीकारहि होते. पोर्तुगालमध्ये राहूनहि त्या काळी सुद्धा ते भारताच्या स्वातंत्र्याचें समर्थन करीत. इटली, बेल्जम, फ्रान्स या देशांतहि त्यांची कीर्ति पसरली होती. जॉन स्टुअर्ट मिल यांचे ते मित्र होते. असे हे गृहस्थ एकनिष्ठ भारतीय होते. फ्रेंच इतिहासकार लॅमारचटाइन याला लिहिलेल्या पत्रांत त्यांनी लिहिलें होतें, "भारत हे एके काळी काव्य, इतिहास, तत्त्वज्ञान यांचें आदिपीठ होतें. अशा भारतांत माझा जन्म झाला आहे. ज्यांनी महाभारत रचलें त्यांचा मी वारस आहें. अशा या माझ्या देशाला आज ग्रहण लागलें आहे म्हणून त्याच्या स्वातंत्र्याची व प्रबोधनाची मी मागणी करीत आहें." (इलस्ट्रेटेड वीकली, दि. १७-८-६९).
 भारतीय याचा अर्थं यावरून स्पष्ट होईल. या भूमीच्या प्राचीन वैभवाचे (रोमच्या वैभवाचें नव्हे) आपण वारस आहों, असें जे अभिमानाने सांगतात ते भारतीय आणि अमृत कौर यांच्या मताने ते हिंदु. तेलो मस्कारेन्हस हे असेच हिंदु आहेत. १९६२ साली या वृद्ध तरुणाने गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी खडतर तुरुंगवास पत्करला. त्यांना कोणी माफी मागण्यास सांगितलें तेव्हा ते कडाडले, "कसली माफी, कशाकरिता? माझ्या देशाची परंपरा माफीची नाही. मी भारतांत जन्मलों आहें. माझ आई-वडील भारतीय आहेत. माझ्यावर भारतीय संस्कृतीचे संस्कार झाले आहेत. माझ्या रक्ताचा थेंबन् थेंब भारतीय आहे. म्हणून मी पोर्तुगीज नागरिकत्व फेकून देत आहे. मला भारतीय नागरिकत्व मिळालें पाहिजे."
 तेलो मस्कारेन्हस अनेक वर्षे पोर्तुगालमध्ये होते. त्या काळांत हिंदुस्थानसंबंधी त्यांनी अनेक पुस्तकें लिहिली. त्यांतील 'हिंदु स्त्री' हें त्यांचें पुस्तक खूप गाजले. या पुस्तकांत सीता, दयमंती यांची चरित्रे त्यांनी अभिमानाने वर्णिली आहेत. भारतीय संस्कृतीची माहिती पोर्तुगीजांना व्हावी म्हणून त्यांनी एक मंडळ तेथे स्थापन केलें होतें. त्याचें नांव 'हिंदु असोसिएशन!' या मंडळाचे सर्व सभासद ख्रिश्चन होते.
 इ. शा. १८