पान:इहवादी शासन.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७२ । इहवादी शासन
 

निरपेक्ष असते. स्वातंत्र्य, समता, सर्वधर्मसमानत्व ह्रीं तत्त्वें अप्रत्यक्षपणें व प्रत्यक्षपणेंहि त्या संघटनेने गृहीत धरलेली असतात. याचे विवेचन मागे अनेक ठिकाणी केलें आहे. त्यावरून हें ध्यानांत येईल की, राष्ट्रवादी मनुष्य हा इहवादाला अनुकूल असतो. राष्ट्रीय ख्रिश्चन समाज तसा आहे. त्याचा सक्तीच्या धर्मांतरावर विश्वास नाही, तर निश्चयाने विरोध आहे.
 मुंबईजवळ सहार या गावच्या मिशनरी शाळेचे रे. डॉ. एल् सी. टोरकॅटो हे मुख्याध्यापक होते. पुष्पा शेनाई नांवाच्या एका मुलीला बाप्तिस्मा देण्याची त्यांना आज्ञा झाली. पण त्यांना असे दिसलें कीं, त्या मुलीचा धर्मांतराला विरोध आहे. तेव्हा त्यांनी बाप्तिस्मा देण्यास नकार दिला. अर्थात् त्याबद्दल त्यांना शाळेंतून बडतर्फ करण्यांत आलें व अनेक प्रकारें त्यांचा छळ करण्यांत आला, तरी ते कचरले नाहीत. कारण असें धर्मांतर हा अत्याचार आहे, असें त्यांना वाटतें. अशा रीतीने धर्मांतर झालेल्यांनी हिंदु धर्मांत पुन्हा परत जावें, असे डॉ. टोरकॅटो जाहीरपणे सांगतात. रे. फादर पिंटो, रे. डिसूझा, फादर सदानंद, रे. मेडोंसा असे त्यांचे अनेक सहकारी आहेत. ते रोमन कॅथॉलिक चर्चच्या असल्या अराष्ट्रीय व अनैतिक आज्ञा निश्चयाने धुडकावतात आणि त्यासाठी होईल तो छळ आनंदाने सोसतात. (मसुराश्रम- पत्रिका, ऑक्टोबर १९६९).
 हा ख्रिश्चन समाज रोमच्या पोपची सत्ता मानीत नाही. हा त्याच्या इहावाद- निष्ठेचा निश्चित पुरावा होय. मागे पाश्चात्त्य देशांतील इहवादाचें विवेचन केलें आहे. त्यावरून दिसून येईल की, राष्ट्रनिष्ठेला पहिला अडसर रोमच्या पोपचा होता आणि त्यानंतर प्रत्येक धर्मसुधारणेच्या म्हणजे इहवादाच्या मार्गांत पोपच आडवा पडत असे. सतराव्या शतकांत त्याचें हें राष्ट्रघातक कार्य करण्यास जेसुइट पंथ पुढे आला व त्याने अनेक देशांतील राष्ट्रसंघटनेला सुरुंग लावण्यांत यश मिळविलें. हिंदुस्थानांत आज हेंच चालू आहे. हें ध्यानांत घेऊनच भारतनिष्ठ ख्रिश्चन समाजाने पोपचें वर्चस्व समूळ उच्छेदून टाकण्याचें ठरविलें आहे. तें आहे तोंपर्यंत कोणताहि समाज राष्ट्रनिष्ठ व इहवादी होऊ शकणार नाही.

पोपला मानीत नाही

 ब्रदर रॉडरिगस यांनी मुंबईचे कॉर्डिनल ग्रेशस यांना एक अनावृत पत्र लिहून निर्भयपणें आपल्या प्रतिज्ञा स्पष्ट केल्या आहेत. ते म्हणतात, 'आम्ही रोमन कॅथॉलिक नाही, इंडियन ख्रिष्चन आहों. आम्ही पोपला मानीत नाही; तो आमचा धर्मगुरु नाही. जीजस आमचा गुरु आहे. पाद्री-संस्थेवर आमचा विश्वास नाही. 'होली सॅक्रिफाइस ऑफ मास', 'ऑरीक्युलर कन्फेशन', 'सेव्हन सॅक्रॅमेंटस्', 'परगेटरी', 'रोमन परंपरा' यांपैकी कशावरहि आमची श्रद्धा नाही. आम्ही फक्त बायबल मानतों. फक्त रोमन कॅथॉलिक चर्चच मोक्ष देऊ शकतें हें आम्हांला मान्य नाही.