पान:इहवादी शासन.pdf/२८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७० । इहवादी शासन
 

 साहजिकच स्वातंत्र्यप्राप्तिबरोबरच ते राजकीय साम्राज्य जसें नष्ट झाले, तसें पोपचें, मिशनऱ्यांचें व इंग्लिश चर्चचे म्हणजे सर्व भारतबाह्य सत्तांचे साम्राज्यहि नष्ट व्हावें, अशी तीव्र आकांक्षा या ख्रिश्चन समाजाच्या मनांत निर्माण झाली. त्याच हेतूने स्वातंत्र्याच्या उषःकाली त्यांनी 'इंडियन नॅशनल चर्च'ची स्थापना केली. आर्चबिशप विल्यम्स, डॉ. त्रिस्तौ कुन्हा, ब्रदर रॉडरिगस अशांसारखे नेते या ख्रिश्चनांना लाभले व त्यांनी परकीय धर्मसत्तेपासून भारतीय ख्रिश्चनांना मुक्त करण्याची चळवळ आरंभिली; कारण या सत्तेने त्यांना गुलाम केलें होतें.
 डॉ. कुन्हा यांनी तर जाहीरपणे सांगितले होते की, ख्रिस्ती धर्मांतराने आमची आत्मिक उन्नति झाली नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा तो हेतूच नव्हता. त्यांच्यामुळे आम्हां भारतीय ख्रिश्चनांची मनें गुलाम झाली. त्यांनी आमची आर्थिक पिळवणूक केली आणि जें जें भारतीय त्यापासून दूर राहवयाचे असे वळण आमच्या मनाला लावलें. मिशनऱ्यांच्या चळवळी या वसाहतवादाच्या प्रस्थापनेसाठी, साम्राज्याच्या स्थैर्यासाठी व प्रजेच्या शोषणासाठी होत्या. या वस्तुस्थितीची ज्यांना जाणीव झाली ते ख्रिश्चन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकी धर्मसत्तेचें जोखडहि फेकून देण्यास उत्सुक झाले असल्यास नवल नाही.

'क्रुसेडर्स लीग'ची स्थापना

 धार्मिक स्वातंत्र्याच्या तीव्र आकांक्षेतूनच १९५० सालीं मंगलोर येथे क्रुसेडर्स लीग ही संस्था जन्माला आली. ब्रदर हेन्री रॉडरिगस व त्यांचे शेकडो रोमन कॅथॉलिक सहकारी यांनी भारतांतील रोमन कॅथॉलिक चर्च व त्यांचे अधिकारी यांच्या अराष्ट्रीय, देशद्रोही व अख्रिश्चन कृत्यांना वाचा फोडण्यासाठी ही संस्था स्थापन केली. अनेक रोमन कॅथॉलिक प्रीस्ट व नन्स त्यांना येऊन मिळाल्या. त्यांनी वृत्तपत्रांतून लेख लिहून व अनेक सभा भरवून कॅथॉलिक सत्तेविरुद्ध असंतोष जागृत करण्यास प्रारंभ केला. अर्थातच कॅथॉलिक सत्ताधीशांनीहि त्यांच्याविरुद्ध मोहीम उघडली. त्यांनी या ख्रिश्चनांच्या सभांवर गुंडांकरवी दगडफेक केली, त्यांच्यार पीठाकरवी बहिष्कार घालण्याची धमकी दिली आणि ब्रदर रॉडरिगस यांच्यावर अनेक खोटेनाटे खटले भरले. पण सर्व खटल्यांतून ते निर्दोष ठरून मुक्त झाले; राष्ट्रीय ख्रिश्चनांची चळवळ फोफावूं लागली आणि अनेक शहरी 'क्रुसेडर्स लीग' च्या शाखा स्थापन भाल्या.
 रॉडरिगस यांनी १९६३ साली 'ख्रिस्तनगर मिशन' अशी दुसरी एक संस्था त्याच कार्यासाठी स्थापिली. १९६४ साली मुंबईला जागतिक ख्रिश्चन समाजाची एक आंतरराष्ट्रीय परिषद् भरली होती. "सर्व भारताचें ख्रिस्तीकरण झाले पाहिजे. येथे ख्रिस्ताचें राज्य स्थापन झालें पाहिजे, या धर्मयुद्धांत विजय मिळविण्याची आमची जिद्द आहे" अशा घोषणा करीतच हजारो ख्रिश्चन पाद्री, इतर धर्मसत्ताधीश व रोमचे पोप हे त्या वेळी भारतांत आले होते. या त्यांच्या घोषणा गुप्त नव्हत्या.