पान:इहवादी शासन.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । १५
 

प्रारंभी तो जरा मंद होता, पण १९२८- २९ साली त्याला उग्र रूप आलें. मुल्ला- मौलवी यांना पकडून हद्दपारी, तुरुंग, देहदंड अशा शिक्षा देण्यांत आल्या. मशिदी बंद करण्यांत येऊन त्यांचें तुरुंग, खानावळी, संग्रहालयें यांत रूपांतर करण्यांत आलें आणि जुन्या सर्व शाळा बंद करण्यांत आल्या. या वेळेपर्यंत कम्युनिस्ट तत्त्वांचा प्रचार थोडाबहुत झाला असल्यामुळे गावोगाव सभा भरवून 'मशिदी बंद कराव्या' असे ग्रामस्थांकडूनच कम्युनिस्टांनी ठराव पास करून घेतले. पुढले सर्व विध्वंस, अत्याचार, दडपशाही यांना असेंच 'ऐच्छिक' रूप कम्युनिस्टांनी दिलेले दिसून येतें. हें सर्व सुलभ जावें म्हणून सोव्हिएट शासनाने रशियन तुर्किस्तानची फाळणी करून मुस्लिम प्रदेशाचे सहा तुकडे केले व अझरबैजान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान इत्यादि नांवें देऊन त्यांची सहा प्रजासत्ताकें बनविलीं. अर्थातच मुस्लिमांची प्रतिकारशक्ति यामुळे ढिली झाली (सर्व्हे ऑक्टोवर, १९६० पृष्ठ १५).

भाविकांचा प्रचार

 कम्युनिस्टांचा तत्त्वप्रचार सतत, अखंड, झंझावाती वादळी वेगाने चालू असल्यामुळे तुर्किस्तानांत त्यांचे अनुयायी वाढू लागले व 'न्यू मॉस्क', 'तुर्किस्तान मिलिटंट अथेइस्ट' अशा त्यांच्या संस्थाहि निघू लागल्या. पण हे मुस्लिम कम्युनिस्ट मनाने कडवे कम्युनिस्ट झालेले नव्हते. ते कम्युनिझमलाच धर्माचें रूप देऊं लागलें. १९२५-२६ साली शासनाने जमीनवांटपाचा कायदा केला तेव्हा कम्युनिस्ट मौलवी असा प्रचार करूं लागले की, "जो जमीनदार आपण होऊन जमीन सोडील त्याच्यावर परलोकांत अल्लाची कृपा होईल." कांही मुस्लिम कम्युनिस्ट भाविकपणें सांगूं लागले की, "कम्युनिस्टांना अल्लानेच धाडलेले असून, लेनिन हा आगाखानाचा मुलगाच आहे ! "इस्लाम व कम्युनिझम हे एकच असून, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा कुराणावरूनच रचलेला आहे," असाहि प्रचार होऊं लागला. पामीर पर्वतावरील कम्युनिस्ट पक्षाचे इस्माइली सभासद हे आगाखान या आपल्या गुरूला नेहमीप्रमाणे सुवर्णदक्षिणा (जकात) देत राहिले. हें सर्व पाहून खरे नास्तिकपंथी मुस्लिम कम्युनिस्टहि लोकांत आपलें वजन राहवें म्हणून मशिदींत पुन्हा जाऊं लागले. पक्षाची बैठक भरली असतांना नमाज पडण्याची वेळ झाली की, तेवढ्यापुरती बैठक तहकूब करण्याची विनंती त्यांना मान्य करावी लागे. पुढे पुढे हा प्रकार थांबला, पण त्या वेळेपुरते सभासद बैठक सोडून जाऊं लागले (सर्व्हे, ऑक्टोवर १९६०, पृष्ठ १३, १४) कम्युनिस्ट पक्षाला मिळालेल्या लोकांची ही स्थिति; मग खऱ्या पाक मुस्लिमांची काय प्रतिक्रिया असेल याची सहज कल्पना येईल. त्यांनी अत्यंत कडवा प्रतिकार केला व त्यापायी अनेकांनी मृत्यूहि पत्करला. स्त्रियांचा बुरखा व शरियत कायदा या प्रकरणी या प्रतिकाराला अतिशय उग्र रूप आलें होतें. पण त्यांत आश्चर्य करण्याजोगें कांही नाही. केमालापाशा हा स्वत: मुस्लिम