पान:इहवादी शासन.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २६३
 

 स्वातंत्र्यापूर्वी या प्रदेशांत ब्रिटिश सरकारने बाहेरच्या हिंदूंना जाण्यास बंदी घातली होती. मिशनऱ्यांना मात्र मोकळीक दिली होती. स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत सरकारने तेथे तेंच धोरण पुढे चालविलें. रे. स्कॉट या मिशनऱ्याने तेथे केवढा उपद्व्याप चालविला आहे हे नित्य जाहीर होत होतें. दीर्घ काळ भारत सरकारने तिकडे दुर्लक्षच केलें. कारण तो मिशनरी होता, आणि भारत सरकार निधर्मी होतें! हिंदुखेरीज अन्य समाजांवर बंधने घालणें त्याच्या धोरणांत बसत नव्हतें.
 वास्तविक मिशनऱ्यांची वृत्ति किती राष्ट्रविघातक आहे, भारताच्या इहवादी धोरणाला त्यांची जातीय, धर्मांध वृत्ति कशी घातक आहे, हें महात्माजींनी उच्चरवाने सहस्र वेळा सांगितलें होतें. डॉ. एल्विन, रे. स्टॅनले जोन्स यांसारख्या ख्रिश्चनांनी तेंच मत मांडलें होतें. तेव्हा भारताच्या संरक्षणाची नेहरूंना अल्प जरी चिंता असती आणि इहवादाचा थोडा अर्थ जरी त्यांना कळला (आणि वळला) असता तरी आसाम, केरळ या सरहद्दीवरच्या प्रदेशांतून तरी त्यांनी मिशनऱ्यांना हाकललें असतें. पण पंडितजींना जागतिक शांतीची चिंता होती. भारताच्या संरक्षणाची नव्हती आणि हिंदू खेरीज अन्य जमातींना सर्व रान मोकळे करून देणें हा त्यांचा इहवादाचा अर्थ होता. त्यामुळे त्यांनी नागालँडमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांना पूर्ण मोकळीक देऊन तेथील नाग टोळ्यांचे राष्ट्रांतर सुखेनैव घडूं दिलें.
 या प्रदेशाचें नांव नागलिमा (लिमा-भूमि) असें ठेवावें, असा तेथील हिंदूंचा आग्रह होता. पण तेंहि त्यांनी मान्य केलें नाही. कारण ख्रिश्चनांना नागालँड हें नांव हवें होतें. या एका गोष्टीवरूनहि ख्रिश्चनांच्या वृत्तीचें पुरेसें दर्शन होतें. पण अशीं दर्शनें डोळे उघडे असलेल्यांना होतात. मिटलेल्यांना नाही. या अंधतेचा परिपाक होऊन नागाप्रदेश विभक्त झाला आहे. आणि आता चीन, पाकिस्तान यांच्या हस्तकांच्या घातक कारवाया तेथे उघडपणें चालू झाल्या आहेत. मिशनऱ्यांना भारताचे खंड-खंड करावयाचे आहेत. त्यांच्या अधीन असलेल्या ख्रिश्चनांनी त्यांचें तें स्वप्न साकार केले आहे.
 छोटा नागपूर विभागांतील झालखंड हें मिशनऱ्यांचें दुसरें असेंच केंद्र आहे. तेथील ख्रिश्चनांनी मिशनऱ्यांच्या चिथावणीवरून स्वतंत्र झालखंडाची चळवळ चालविली आहे. १५ ऑगस्ट रोजी भारतभर स्वातंत्र्याचा जयजयकार होतो. तर झालखंडांत तेथील ख्रिश्चन लोक, "हे इसामसीह, हमारा खोया हुआ राज्य हमे वापस दे" अशी प्रार्थना करतात. या भागांतील एका पाद्र्याने एका हिंदूची जमीन विकत घेतली. पण पैसे देण्याच्या वेळीं, "तूं ख्रिस्ती झालास तरच तुला पैसे देईन असें सांगितलें. यासारखी आणखी सात-आठ प्रकरणे झाली. तेव्हा आजूबाजूच्या पन्नास गावांच्या लोकांनी उठाव करून न्यायालयांत दाद मागितली आणि सर्व