पान:इहवादी शासन.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २६१
 

लोकांच्या जवळ नाहीत. ते केवळ दाखविण्यापुरते आहेत. त्यांचे हेतु राजकीय आहेत. लॉर्ड रीडिंग व लॉर्ड आयर्विन हे दोघे भारताचे व्हाईसरॉय असतांना त्यांनी मिशनऱ्यांची काय प्रशस्ति केली ? "लष्कर, न्यायालयें, राज्यपाल यांच्यापेक्षा मिशनरी हे जास्त महत्त्वाचें कार्य करीत आहेत. एक मनुष्य ख्रिश्चन झाला की तितकी साम्राज्याच्या सामर्थ्यात भर पडते." मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या चळवळीमागचा हा हेतु महात्माजींनी जाणला होता. जातवार प्रतिनिधीत्वाचें तत्त्व त्या वेळीं मान्य झालें होतें. अशा वेळी कोणत्याहि जमातीच्या लोकसंख्येला महत्त्व येणारच. तें पाहूनच मिशनऱ्यांनी जोरांत चळवळ चालविली होती.
 मिशनऱ्यांच्या कार्यामागे राजकीय हेतु असावा, अशी शंका भारताच्या बहुतेक सर्व पुढाऱ्यांना आलेली होती. स्वातंत्र्यानंतर वल्लभभाईंनी मिशनऱ्यांना सांगितलें की, तुम्ही, "वैद्यकीय सेवा करा, धर्मप्रसार करण्याचाहि तुम्हांला हक्क आहे. पण सामुदायिक धर्मांतर करून जातीय दृष्टि वाढवू नका." मौ. आझादांनी हेंच सांगितलें, "तुम्ही राजकीय हेतूने सामुदायिक धर्मांतर करूं नका." राजगोपालाचारी म्हणाले की, "धर्मांतराचा तुम्हांला हक्क आहे, पण त्याने भारतीय समाज दुभंगतो. तेव्हा तुम्ही फक्त समाजसेवेचें कार्य करा." पंडित जवाहरलाल यांनी त्यांना संदेश दिला की, "भारताला मातृभूमि मानून त्याच्या नव्या घडणींत जे कोणी साह्य करतील त्यांचें आम्ही स्वागतच करू."

विभक्त वृत्तीची जोपासना

 भारतांतील ख्रिश्चन मिशनरी हे इहवादविरोधी आहेत काय, हें तपासून पाहण्यासाठी आपण आरंभी कांही प्रश्न निर्माण केले होते. त्यांच्या उत्तरावरून काय दिसतें ? सर्वधर्मसमानत्व हें तत्त्व त्यांना मान्य नाही. सहिष्णुता त्यांना त्याज्य वाटते. माणूस म्हणून त्यांच्या लेखी माणसाला किंमत नाही. महात्माजींसारख्या महापुरुषाला सुद्धा नाही. तो ख्रिस्ती झाला तरच त्यांचें त्यांना महत्त्व. मानवत्वाची प्रतिष्ठा त्यांना मान्यच नाही. मतपरिवर्तनाने, बुद्धीला, धर्मविचारांना आवाहन करून धर्मांतर करावें, असें त्यांचें धोरण नाही. विलोभनें दहशत, दंडेली व इतर अनेक वाममार्ग यांचा ते आश्रय करतात. जातीयता त्यांच्या हाडीमासीं खिळली आहे. ख्रिश्चन जमात ही इतर भारतीयांहून अलग राहवी, विभक्त व्हावी असें त्यांचे प्रयत्न असतात. त्यामुळे धर्मांतरितांच्या मनांत ते अराष्ट्रीय वृत्तीची जोपासना करतात.
 इहवादाचें आतापर्यंत जें विवेचन केलें आहे, त्यावरून हें ध्यानांत येईल की, यांतील प्रत्येक कृति, प्रत्येक विचार व त्यामागली वृत्ति ही इहवादाला अत्यंत घातक आहे. अशा वृत्तीच्या मिशनऱ्यांचा भारतीय ख्रिश्चन समाजावर फार प्रभाव असल्यामुळेच भारतांत अनेक ख्रिस्तीस्थानें निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.