पान:इहवादी शासन.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६० । इहवादी शासन
 

तर तुला कर्ज माफ करूं," असें विलोभन दाखवून त्यांना वाटवावयाचें, असा मिशनऱ्यांचा उद्योग असतो. संघाचे चिटणीस म्हणतात, "येथे हजारो लोकांना मिशनऱ्यांनी ख्रिश्चन केलें, पण त्यांतील एकहि धर्मांतर मतपरिवर्तनामुळे झालेलें नाही."
 अमृतकौर यांनी मिशनऱ्यांच्या धर्मांतर पद्धतीविषयी हेंच मत दिले आहे. त्या म्हणतात, हरिजनांच्या दैन्य- दारिद्र्याचा मिशनरी फायदा घेतात आणि त्यांना तथाकथित ख्रिश्चन धर्माची दीक्षा देतात. तथाकथित म्हणण्याचें कारण असें की, धर्मांतरितांपैकी एकालाहि ख्रिश्चन धर्माची तत्त्वें माहीत नव्हती. (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठ १२४) धर्मांतरासाठी मिशनरी वाटेल ते अत्याचार करण्यास मागेपुढे पाहत नाहीत हे नियोगी समितीने सप्रमाण दाखवून दिले आहे.
 कै. हरिभाऊ पाटसकर मध्यप्रदेशचे राज्यपाल असतांना मिशनऱ्यांनी चालविलेल्या कुष्टरोगाश्रमांतून तीनशे महारोगी तीस मैल त्यांच्या निवासापर्यंत चालत आले व त्यांनी पाया पडून राज्यपालांना सांगितलें की, "आम्हांला जबरीने प्रिश्चन करण्यांत येत आहे, आम्हीं बाटण्यास नकार दिला त्यामुळे आम्हांला तीन-तीन दिवस उपाशी ठेवून आमचे हाल करण्यांत येतात. आम्हांला आपण या संकटातून वाचवा."
 ख्रिश्चन शाळांत हिंदु लोक मुलें पाठवितात. अनेक वेळा मुलांच्या नावांची नोंदणी करतांना शाळेचे चालक धर्म या सदरांत ख्रिश्चन, असें पालकांना न कळवितां, लिहून ठेवतात. आणि शाळा सोडतांना तसेंच लिहून देतात. नोंद वहींत मुळांत तसें असल्यामुळे पालकांचें कांही चालत नाही. अहमदनगर जिल्ह्यांत भाऊसाहेब धनाजी साळवे यांना असा दाखला मिळाला. त्यांच्या नकळत ते ख्रिश्चन झाले होते. तेथील हिंदुसभेने शुद्धिविधि करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मांत परत घेतलें म्हणून निभावलें. मुंबईच्या एका मुलीच्या मिशनरी शाळेच्या चालकांनी हिंदु मुलींना बांगड्या घालण्यास व कुंकू लावण्यास बंदी केली व ज्या मुलींनी ऐकलें नाही त्यांना शिक्षा केली. अनेक शाळांत हिंदु मुलांना बायबल बळेंच शिकविलें जातें आणि हिंदु देवतांची विटंबना करणारी चित्रे दिली जातात.

एल्विन यांचा इशारा

 डॉ. बेरियर एल्विन हे एक इंग्रज पाद्री आहेत. त्यांनी भारताला असा इशारा दिला आहे की, "मिशनऱ्यांनी जें धर्मांतराचें राष्ट्रद्रोही कार्य चालविलें आहे त्याला वेळींच आळा घातला नाही, तर सर्व आदिवासी जनता अराष्ट्रीय होऊन भारताच्या कुशीत ती एक कट्यार घुसेल." जे. सी. कुमाराप्पा यांनी असाच इशारा दिला आहे.
 यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते की, मानवता, मानवसेवा, श्रेष्ठ धर्मतत्त्वांचा प्रसार, दीन-दलितांची आध्यात्मिक उंची वाढविणें हे व असले उदात्त हेतु मिशनरी