पान:इहवादी शासन.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २५९
 

म्हणतात, "ख्रिस्ती झालेले लोक बहुतेक वेळा अराष्ट्रीय झालेले दिसतात. ते भारताशी एकरूप न होतां स्वतःला पाश्चात्त्य समजतात." (महात्मा गांधी, पृष्ठ ८७, ९०).
 अमृतकौर यांनीहि याच मताला पुष्टी दिली आहे. "अनेक ख्रिश्चन अराष्ट्रीय झालेले आहेत. स्वातंत्र्य आलें तर आपले काय होणार, अशी त्यांना चिंता वाटते." (ख्रिश्चन मिशन्स, पृष्ठ १२३). ख्रिश्चन झालेला मनुष्य भारतीय समाजा पासून विभक्त होतो. तो भारताच्या सुखदुःखाशी एकरूप होत नाही, ही फार मोठी हानि मिशनऱ्यांच्या कार्यामुळे झाली आहे. 'कॅरिटास इंटरनॅशनॅलिस्ट' या संस्थेच्या फादर चार्लस ग्रेंज या अधिकाऱ्याने भारतांतील मिशनऱ्यांवर हीच टीका केली आहे. अमेरिका व इतर देश येथून आलेल्या अन्नधान्याचे भारतांत वाटप करण्याचें काम ही संस्था करते. फादर ग्रेंज हे १९६५ पर्यंत महाराष्ट्रांत मिशनरी म्हणून काम करीत होते. आता ते कॅरिटासचे अधिकारी आहेत. परकी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विरुद्ध भारतांत काहूर उठले आहे, त्याला त्यांचे कर्मच कारणीभूत आहे, असें त्यांनी आपल्या पत्रांतून मिशनऱ्यांना सुनविलें आहे. हें कर्म कोणतें?
 फादर ग्रेंज म्हणतात, "हे मिशनरी विकास योजनांत कार्य करतात, पण त्यांत भारतीयांशीं सहकार्य करीत नाहीत. सवता सुभा ठेवतात. भारतीयांनी चालविलेल्या कामाची ते तुच्छतापूर्वक हेटाळणी करतात. स्थानिक प्रशासकांना सुद्धा समाजसेवेच्या कार्यांत सहभागी करून घेत नाहीत. हाती आलेल्या धनाच्या वांटपाच्या कामांत भारतीय अधिकाऱ्यांना दूर ठेवतात. हें धन प्रामुख्याने धर्मप्रसाराच्या हेतूने वापरतात. जणू काय तें सर्व पोपकडून आले आहे."
 याचा स्पष्ट अर्थ असा की, मिशनरी भारतीय समाजाशी एकरूप, समरस होण्यास तयार नाहीत. माणसाकडे माणूस म्हणून ते पाहवयास तयार नाहीत. आपण ख्रिश्चन श्रेष्ठ व हे हिंदु हीन, रानटी लोक आहेत असा त्यांचा भाव असतो.

वाममार्गाचा अवलंब

 पण यापेक्षाहि निंद्य असें मिशनऱ्यांचें धोरण म्हणजे ते धर्मांतराच्या चळवळीत मानवत्वाची प्रतिष्ठा ठेवीत नाहीत. आपलीं धर्मतत्त्वें भारतीय जनतेच्या बुद्धीला पटवून देऊन लोकांचे मतपरिवर्तन करून धर्मांतर करावयाचें हा राजमार्ग होय. पण हा मार्ग न अनुसरतां मिशनरी धनाचें, सुखस्वास्थ्याचें, प्रतिष्ठेचें विलोभन दाखवून आणि कित्येक वेळा अत्यंत वाममार्गाने व दंडेलीने धर्मांतर घडवितात.
 ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर कसें करतात ते हरिजन सेवक संघाने, शहाबाद (बिहार) येथील धर्मांतराचा वृत्तान्त दिला आहे, त्यावरून कळून येतें. मिशनऱ्यांचा सर्व भर हरिजनांचें धर्मांतर करण्यावरच असतो. त्यांना अडीअडचणींत कर्जाऊ पैसे द्यावयाचे, कायद्याचा सल्ला द्यावयाचा आणि मागून "ख्रिश्चन झालास