पान:इहवादी शासन.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४ । इहवादी शासन
 

समता असा शब्दार्थ नसला तरी तसा भावार्थ निश्चित आहे. त्या दृष्टीने पाहतां जुन्या धर्माचें निर्दाळण करून या तत्त्वान्वये सोव्हिएट नेत्यांनी समाजरचना केली असती, तरी सोव्हिएट शासन इहवादी ठरलें असतें. पण तसें त्यांनी केलें नाही. कुटुंबव्यवस्था, शेती, औद्योगीकरण, विज्ञान या सर्वच क्षेत्रांत तें अंधवचनप्रामाण्याने चालू लागेल. त्यामुळे रशियाची अपरिमित हानि झाली आहे. सुदैवाने आता मनु जरा पालटत आहे. तो पालटून तेथे व्यक्तीला प्रतिष्ठा आली, बुद्धीला प्रामाण्य आले तर, पुढील कांही दशकांत सोव्हिएट शासन खऱ्या अर्थाने इहवादी होण्याचा संभव आहे.


 रशियांतील मुस्लिम समाज, त्याचा धर्म, त्याचे आचार, त्याच्या सामाजिक रूढी यांविषयी इहवादी सोव्हिएट शासनाने प्रारंभापासून कोणतें धोरण स्वीकारले आहे, त्याचा विचार या लेखांत करावयाचा आहे. धर्म ही संस्था समाजघातक आहे, धनिकांचें तें दलितांना शोषण्याचें साधन आहे, ती अफू आहे असाच कम्युनिस्टांचा सिद्धान्त असल्यामळे ख्रिस्ती धर्म, मुस्लिम धर्म, ज्यूंचा धर्म यांत फरक करण्याचें त्यांना कांहीच कारण नव्हतें व नाही. या दृष्टीने सर्वधर्मसमानत्व ते मानतात. त्या सर्वांचा समूळ उच्छेद केला पाहिजे, यांविषयी त्यांना शंका नाही. तेव्हा मुस्लिम धर्माविषयी त्यांचा भिन्न दृष्टिकोन असेल, असें वाटण्याचें कारण नाही.
 मात्र सत्ता हातीं येतांच रशियन ऑर्थोडॉक्स चर्चवर सोव्हिएट शासन जसें एकदम तुटून पडलें तसें इस्लामवर पडलें नाही, हें खरें. पण त्याची कारणें साधी आहेत. मुस्लिमांचा रशियन तुर्किस्तान हा प्रदेश मॉस्कोपासून फार दूर, मुस्लिम समाज अत्यंत मागासलेला, त्यांचा धर्माभिमान अत्यंत कडवा, पश्चिम रशियांतील प्रदेशांच्या मानाने तुर्किस्तानांतील कम्युनिस्ट सभासदांची संख्या अत्यल्प, त्या समाजांत कम्युनिझमच्या तत्त्वांचा प्रसारहि अत्यल्प; अशा अनेक कारणांनी अगदी प्रारंभी त्या समाजाविषयी सोव्हिएट शासनाने जरा नरम धोरण स्वीकारलें होतें. पण तें राजनीतीच्या दृष्टीने भिन्न दृष्टिकोनामुळे नव्हे. कारण दोन-तीन वर्षांचा काळ जातांच १९२० साली बाकू येथील काँग्रेसच्या बैठकींत अध्यक्ष झिनोव्हिफ याने मुस्लिम धर्मावर उघड चढाई केली व हिरव्या निशाणाऐवजी लाल बावटा घ्यावा, इस्लामच्या जागीं कॉमिटर्न मानावें व लेनिनला पैगंबर समजावें असा मुस्लिमांना उपदेश केला (करंट हिस्टरी, जून ५७, पृष्ठ ३५२) . यामुळे अर्थातच मुस्लिम समाजांत संतापाची भयंकर लाट उसळली आणि धर्मसंग्राम सुरू झाला.