पान:इहवादी शासन.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ख्रिश्चन समाज । २५५
 

घडवितात ? आदिवासी, हरिजन या भारतांत फारच कनिष्ठ व हीनदीन अश जमाती आहेत. ख्रिश्चन झाल्यावर त्या इतर श्रेष्ठ पातळीवरच्या ख्रिस्ती समाजाशीं एकरूप होऊन जातात काय? का ख्रिस्ती धर्मांतहि जातीयता आहे? ख्रिस्ती झालेले लोक इतर भारतीय समाजाहून विभक्त होतात, की आपण सर्व भारतीय एक असें मानून एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचा परिपोष करतात? समता, मानवत्वाची प्रतिष्ठा, सर्वधर्मसमानत्व या इहवादाच्या तत्त्वाअन्वये त्यांनी तसें करणें अवश्य आहे. मग या दृष्टीने ख्रिश्चन जमातीचें काय धोरण आहे ? ख्रिश्चन लोक भारताला आपली मातृभूमि मानतात काय ? तसें मानून या भूमीच्या प्राचीन परंपरेचा अभिमान धरून ती आपलीच परंपरा आहे अशी आत्मीयतेची वृत्ति ते धारण करतात की नाही ?
 भारतांतील ख्रिश्चन जमातीचा इतिहास पाहून, आजच्या श्रेष्ठ ख्रिश्चनांची मतें व आचार पाहून, मिशनऱ्यांनी चालविलेल्या धर्मांतराच्या मोहिमेचा व त्यांच्या इतर कार्याचा अभ्यास करून वरील प्रश्नांची उत्तरें आपल्याला शोधली पाहिजेत आणि त्या उत्तरांवरून ख्रिश्चन समाज ही इहवादविरोधी शक्ति आहे काय या प्रश्नाचा निर्णय केला पाहिजे.

भारतनिष्ठ चर्च

 शब्दप्रामाण्यबुद्धि, अंधश्रद्धा, बाह्यनिष्ठा, विभक्तवृत्ति, आत्यंतिक जातीयता, अत्याचारी आक्रमक प्रवृत्ति या दृष्टीने पाहतां भारतीय ख्रिश्चन समाज मुस्लिम समाजासारखा एकरूप नाही. मुस्लिमांत वरील इहवादविरोधी कल्पनांतून मुक्त असलेले लोक नाहीत असें नाही. पण ते अल्प, अत्यल्प, अगदी नगण्य. त्यांना मुस्लिम समाजांत मुळीच स्थान नाही. ख्रिश्चन समाजाची स्थिति याहून थोडी निराळी आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या 'इंडियन नॅशनल चर्च'चे अनुयायी हे इहवादविरोधी नाहीत, ते भारतनिष्ठ आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत; पोपचें वर्चस्व, त्याची सत्ता त्यांना मान्य नाही. भारतीय परंपरेचा त्यांना अभिमान आहे. शिवछत्रपति, सावरकर यांना ते वंद्य मानतात. परकी मिशनऱ्यांचा त्यांना हिंदुत्वनिष्ठांप्रमाणेच संताप येतो. आणि अशा या 'नॅशनल चर्च' च्या अनुयायांची संख्या अगदीच उपेक्षणीय नाही. तेव्हा त्यांचा विचार आपल्याला स्वतंत्रपणें करावा लागेल.
 त्यानंतर दुसरा वर्ग म्हणजे मिशनऱ्यांचा. या वर्गांत परकी व भारतीय मिशनरीहि येतात. हे मिशनरी हा ख्रिश्चन समाजांतला दुसरा वर्ग आणि त्यांचे वर्चस्व असलेला भारतीय ख्रिश्चन समाज हा तिसरा वर्ग असे भिन्न वर्ग घेऊन त्यांचा इहवादाच्या दृष्टीने विचार करणें अवश्य आहे. कारण ते परस्परांहून बरेच भिन्न असल्यामुळे एकच एक रूप मानून, त्यांचा विचार करणें हें अन्यायाचें होईल, त्यामुळे वास्तवापासून आपण दूर जाऊ. तेव्हा ख्रिश्चन समाजांतील भिन्न वर्गांचा