पान:इहवादी शासन.pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २५३
 

पगडा फार आहे. त्यामुळे तेथे ग्रामपंचायतींत जातीय व जमातीय भावना नव्याने उफाळून आल्या आहेत. पंचायत राज्यामुळे सामाजिक सुधारणा मुळीच झाली नाही. उलट परागतीच झाली आहे. अकार्यक्षमता, गटबाजी, लाचलुचपत हे दोष वाढीला लागले आहेत. एकंदरींत विकेंद्रीकरणाचा प्रयोग फसला आहे." हा १९६४ सालचा अहवाल आहे. त्यानंतरचे अनेक राज्यांचे अहवाल हेंच सांगत आहेत.
 अस्पृश्यता- निवारणाच्या दृष्टीने ग्रामीण भागांत परिस्थिति फार निराशा- जनक आहे. अस्पृश्यांना देवळांत प्रवेश नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरतां येत नाही. हॉटेल, सलून, येथे त्यांना मज्जाव आहे आणि याच्या जोडीला त्यांच्यावर भीषण अत्याचार सुरू आहेत. केंद्राचा या खात्याचा अहवाल सांगतो की, "कायदे केलेले आहेत, पण त्यांचा अंमल होत नाही."
 स्वतः काँग्रेसच जातीय विषाचा प्रसार करीत असल्यामुळे जातीयतेचा हा भस्मासुर सर्व संस्थांच्या डोक्यावर हात ठेवीत आहे.
 मद्रासमध्ये हरिजनांच्या शाळा निराळ्या कां असें विचारतां, स्पृश्य जनतेचें हृदयपरिवर्तन झाल्यावांचून एकत्र शाळा करतां येणार नाही, असें शिक्षणमंत्री म्हणाले (टाइम्स, दि. १३- ९- १९५०). तामिळनाडू, म्हैसूर या प्रदेशांत कॉलेजमध्ये जातीय तत्त्वावर जागा देण्याचे कायदेच झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने ते पुनः पुन्हा रद्द केले. पण निराळ्या मार्गाने प्रादेशिक शासनें तेच करीत राहिलीं, हें प्रसिद्धच आहे. विद्यापीठांतहि जातीयता तशीच आहे.
 १९६९ सालीं नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालांत म्हटलें आहे की, "बिहार व तामिळनाडू येथील विद्यापीठांचे अधिकारीच जातीय वृत्तीचे आहेत. प्रवेश, नेमणुका, बदल्या सर्व कांही जात पाहून होतें. वरच्या जातीच्या हुशार मुलांनाहि इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजांत प्रवेश मिळत नाही. हें विष फार फार खोल गेलें आहे! (टाइम्स, दि. २०-९-१९६९). क्रिकेट बोर्डात जातीयता, सहकारी संस्थांत जातीयता आणि शेवटीं मंत्रिमंडळांतहि जातीयता!
 अशा रीतीने बुद्धिप्रामाण्य, जातिधर्म-निरपेक्ष राज्यकारभार, मानवता, व्यक्ति हें अंतिम मूल्य मानणें (जाति नव्हे) आदि इहवादाच्या प्रत्येक तत्त्वाचा काँग्रेस-श्रेष्ठांनी अवमान केला आहे. आणि अजूनहि तेंच चालू आहे. यामुळेच काँग्रेस ही भारतांतील सर्वात जास्त विघातक अशी इहवादविरोधी शक्ति झाली आहे. ती तशी असल्यामुळे तर भारताची हानि झाली आहेच. पण शिवाय तिने कम्युनिस्ट, मुस्लिम लीग, ख्रिश्चम मिशनरी यांना उत्तेजन देऊन त्यांचें पोषण केल्यामुळे भारताच्या भवितव्याविषयी चिंता वाटणें स्वाभाविक आहे.