पान:इहवादी शासन.pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५२ । इहवादी शासन
 

 भारतांत पुरातनकाळापासून अनेक धर्म, धर्मपंथ, वर्ण, जाति, पोटजाति यांचा बुजबुजाट झालेला आहे. ब्राह्मण, मराठा, कायस्थ, रजपूत, भूमिहर, रेड्डी, कम्मा, शीख, जैन, लिंगायत, महार, चांभार, मांग, धेड- अनंत जाति, अनंत पंथ! हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू– अनेक धर्म आणि पंजाब, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक– अनेक प्रांत, अनेक भाषा- यांमुळे अखिल भारतीय राष्ट्रीय भावना येथे कधी निर्माणच झाली नाही. ती गेल्या शतकांत पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे झाली. त्या विद्येमुळे बुद्धिप्रामाण्य कांही प्रमाणांत आलें. व्यक्तिस्वातंत्र्य आलें, मानवाला, व्यक्तीला तिच्या गुणकर्मांनी प्रतिष्ठा मिळावी; जातीमुळे, जन्मामुळे नव्हे, हा विचार आला. यांतूनच धर्म-जातिभेदातीत राष्ट्रभावना निर्माण झाली व राममोहन, रानडे, आगरकर, टिळक, विवेकानंद, सावरकर, महात्माजी या थोर पुरुषांनी तिचा परिपोष केला. त्यामुळेच स्वातंत्र्यलढा यशस्वी झाला.
 पण त्यालाहि संपूर्ण यश आलें नाही. कारण आधीचीं तीस वर्षे काँग्रेस मुस्लिम जातीयवादाचा सतत परिपोष करीत होती. भारताची फाळणी झाली ती त्यामुळेच. तरीहि स्वातंत्र्यानंतर राहिलेल्या भारतांत जाति, धर्म, पंथ, प्रांत, हे भेद नष्ट करण्याचा सतत प्रयत्न करून काँग्रेस या खंडित भारतांत तरी राष्ट्रभावनेची प्राणपणाने जोपासना करील अशी अपेक्षा होती; पण दुर्दैवाने तें घडलें नाही. आणि काँग्रेसच्याच नेत्यांनी– वल्लभभाई, नेहरू, कृपलानी, राजेंद्रबाबू, पट्टाभिसीतारामय्या यांनी व निरनिराळ्या समित्यांनी म्हटल्याप्रमाणे सत्तालोभामुळे, निवडणूक- निष्ठेमुळे जातीयतेचा परिपोष करून राष्ट्रभावनेचाच नाश केला.

इतरांचीहि तीच स्थिति

 दुर्दैव असे की, पुरोगामित्वाचें, इहवादाचें कंकण बांधणारे समाजवादी पक्ष (त्यांच्या सर्व जाति पोटजाति), कम्युनिस्ट पक्ष हेहि काँग्रेसइतकेच किंबहुना थोडे जास्तच जातीय झाले. निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल त्या पक्षाशी सोयरीक करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिलें नाही व अजूनहि ते तसे पाहत नाहीत.
 आणि अशांतच जिल्हा परिषदा व ग्रामपंचायती या संस्था निर्माण झाल्या. त्यांनी तर उरलीसुरली राष्ट्रभावना पार निपटून काढली. शहरी लोकांवर पाश्चात्त्य विद्येचे कांही तरी संस्कार झाले होते. ग्रामीण भागांतील नेते त्यांतून पूर्णपणें मुक्त होते. त्यामुळे अंधश्रद्धा, जातीय अहंकार, वैयक्तिक दृष्टि, पुराणमतवाद या भारतीय समाजाच्या दोषांना तेथे कसलाच उतार पडला नव्हता. अर्थातच व्यक्तित्व, मानवत्वाची प्रतिष्ठा, बुद्धिप्रामाण्य यांचें नांवहि तेथपर्यंत पोचलें नव्हतें. अशा स्थितींत तेथे राजकारण मात्र शिरलें. त्यामुळे तेथे अनर्थ होऊन राहिला आहे.
 राजस्थान विद्यापीठाने पंचायत राज्यांचा अभ्यास करून आपला अहवाल १९६४ साली प्रसिद्ध केला. हा अहवाल म्हणतो, "खेड्यांत जाति-पोटजातींचा