पान:इहवादी शासन.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २५१
 

निवडणुकांच्या बाबतींत जातीयतेचा विनाखंत आश्रय करतात. काँग्रेसने स्वातंत्र्यप्राप्ती पासून इहवादाच्या घोषणा चालविल्या आहेत. आणि तेव्हापासूनच त्या उदात्त तत्त्वज्ञानाला हरताळ फासण्यालाहि प्रारंभ केला आहे. कसा तो पाहा:
 डॉ. गोपीचंद भार्गव यांनी नोकऱ्यांमध्ये शीखांना जाहीरपणें राखीव जागा देऊ केल्या. निवडणुकीची वेळ जवळ आली की जातीय विष सर्वांच्याच अंगांत शिरतें. शीखांमुळेच नेता म्हणून भार्गवांची निवड झाली. (टाइम्स, दि. २३-२-१९४९) अकाली दल ही पूर्णपणें जातीय संस्था आहे. १९४७ सालींच एक पत्रक काढून जाहीर केलें होतें की, शिखांना कोठे तरी सत्ता मिळाल्यावांचून त्यांच्या धर्म व संस्कृति यांचें रक्षण होणार नाही. आज अकाली दल पंजाबमध्ये सत्तारूढ आहे आणि काँग्रेस त्याच्याशीं अनेक वर्षे सहकार्य करीत आहे.
 आसाममध्ये १९५२ साली काँग्रेसने जुन्या मुस्लिम लीगवाल्यांना तिकिटें दिल्याचें सर्वांना माहीत आहे. बिहारमधील भूमिहर व रजपूत या दोन जातींमध्ये सारखी चुरस आहे. १९५२ सालीं भूमिहरांचे नेते होते श्रीकृष्णसिंह व रजपूतांचे अनुग्रह नारायण. दोघेहि काँग्रेसचेच. या वेळीं काँग्रेसच्या प्रचारभाषणांत जातीय विष थबथबून आलेलें दिसत होतें. कांही ठिकाणी काँग्रेसबाहेरच्या स्वजातीयांचा पुरस्कार काँग्रेस-पीठावरून जाहीरपणें होत होता. तिकिटे दिली गेलीं तीं जातीय तत्त्वावरच. (टाईम्स, दि. ३-१-१९५२). याच वेळीं पंडितजी रांचीच्या भाषणांत म्हणाले की, 'जातीयवादी लोकांना काँग्रेसमधून हाकून देण्यांत येईल.' अर्थात् काळा बाजारवाल्यांना फाशी देण्यांत येईल, खोटे सभासद नोंदणाऱ्यांना कठोर शासन करण्यांत येईल, या त्यांच्या धमक्यांप्रमाणेच हीहि धमकी कधी अमलांत आली नाही.
 निवडणुका जिंकावयाच्या तर त्या धमक्या अमलांत आणून भागणार नाही हें लवकरच काँग्रेसजनांनी त्यांच्या ध्यानांत आणून दिलें असावें. म्हैसूर राज्यामध्ये लिंगायत व व्होक्कालिग या जातींत कायमची दुफळी आहे. १९६९ साली माजी महसूलमंत्री एम्. व्ही. कृष्णाप्पा यांनी तक्रार केली की, "पूर्वीच्या म्हैसूरचे जे नऊ जिल्हे, त्या विभागाला सावत्र वागणूक मिळत असून, त्यामागे जातीय व राजकीय कारणें आहेत. सर्वत्र लिंगायतांचें वर्चस्व असून, इतरांना वाव मिळत नाही." (टाइम्स, दि. २३ जुलै १९६९).
 आता काँग्रेस द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षाशी सहकार्य करीत आहे. हा पक्ष म्हणजे रामस्वामी नायकरांचा कमालीचा जातीय पक्ष. त्याचें स्वरूप नव्या नेत्यांनी कांहीसें पालटलें आहे. पण त्याची जातीयता नष्ट झालेली नाही. उलट प्रांतीयतेची त्यांत भरच पडली आहे. अखिल भारतीय असें त्या पक्षाला कांही नको आहे. सेना नको, लष्कर नको, ध्वज नको, भाषा नको; आणि अशा पक्षाशी काँग्रेसने सूत जमविलें आहे.