पान:इहवादी शासन.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५० । इहवादी शासन
 

ती म्हणजे भारताला जगांत एकहि मित्र राहिला नाही. ज्या रशियासाठी पंडितजींनी जीव पाखडला त्यानेच पाकिस्तानच्या लढाईतलें भारताचें यश ताश्कंद करार करायला लावून हिरावून घेतलें. पंडितजींच्या कम्युनिस्टांवरील अंध, अविवेकीश्रद्धेमुळे भारत एकाकी, असहाय झाला. परराष्ट्रनीतीचें आणखी अपयश तें काय?
 त्याचप्रमाणे चेकोस्लोव्हाकियावरील रशियाचें आक्रमण याचा निःसंदिग्ध निषेध आपण करूं शकत नाही व व्हिएटनामबाबत फक्त अमेरिकेलाच ठपका देतों, याचा अर्थ लोकांना समजतो.
 कम्युनिझमवरील अंधश्रद्धेमुळे पंडितजींनी भारताची आणखी अनेक प्रकारांनी हानि केली आहे. कम्युनिस्ट देशांसंबंधीच्या त्यांच्या प्रेमामुळे कम्युनिस्ट पक्षाला भारतांत रान मोकळेंच झालें. शिवाय कृष्ण मेनन, केशवदेव मालवीय अशा कम्युनिस्टांच्या सहप्रवाश्यांना त्यांनी केंद्र-मंत्रिमंडळांत महत्त्वाच्या जागा देऊन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला खतपाणीच घातलें. अशा रीतीने स्वातंत्र्यांनंतर मुस्लिम लीग, ख्रिश्चन मिशनरी या राष्ट्रद्रोही इहवादघातक शक्तींचा पंडितजींनी जसा परिपोष केला, तसाच कम्युनिस्ट पक्ष या दुष्ट शक्तीचाहि केला आणि भारताच्या प्रगतीच्या मार्गांत अनेक अडसर निर्माण करून ठेवले.
 कम्युनिझमवरील अंधश्रद्धेमुळे काँग्रसने व तिच्या नेत्यांनी इहवादाची एकपट गळचेपी केली असेल, तर सत्तालोभाने त्यांनी दसपट गळचेपी केली आहे. निवडणुकांत जातीयता, पक्षपात, राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष, विषम नीति यांचा अवलंब काँग्रेस प्रारंभापासून करीत आली आहे. आणि जातीयता एकदा आली की मानवत्वाची प्रतिष्ठा, व्यक्तीचें स्वातंत्र्य, सत्यनिष्ठा हीं इहवादाची सर्व मूल्यें वाऱ्यावर उधळलीं जातात. काँग्रेसने ती तशी उधळली आहेत, हें काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनीच वेळोवेळीं सांगितले आहे.
 डॉ. संपूर्णानंद यांनी विधानसभेत भाषण करतांना स्पष्टपणे सांगितलें की, जातीयता ही आपल्या रक्तांतच भिनलेली आहे. १९५९ साली काँग्रेस पार्लमेंटरी पक्षाने नेमलेल्या दशसभासद समितीने काँग्रेसच्या कारभाराची तपासणी करून अहवाल सादर केला. त्यांत म्हटलें आहे की, "काँग्रेसमध्ये ध्येयवाद, निष्ठा हें कांही राहिलेलेच नाही. सत्ता हेंच तिचें प्राप्तव्य झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय वृत्तिलोपत असून जातीयतेचें विष पसरत चाललें आहे."

जातीयतेचा आश्रय

 नुकतेच मुंबईला श्री. अच्युतराव पटवर्धन यांनी बलवंतराय मेहता स्मारक व्याख्यानमालेत बोलतांना सांगितले की, "समाजवादाच्या विकासाला भांडवलदार वर्गापेक्षा समाजवादी म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांकडूनच जास्त गंभीर धोका आहे." हें विधान इहवादाच्या बाबतींतहि तितकेंच सत्य आहे. कारण सर्व पक्ष