पान:इहवादी शासन.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २४९
 

नाही, हे समजण्यास कांही अवघड नव्हतें. पण ते वास्तव जगांत राहणाऱ्याला, स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्याला, इहवादी दृष्टीने संपन्न असणाऱ्याला! स्वप्नांत वावरणाऱ्या अंधश्रद्ध मनुष्याला नव्हे.
 याहि बाबतींत आपण तसें होतों आणि त्यामुळेच फसलों हें पडितजींनीच सांगून ठेवलें आहे. ८ नोव्हेंबर १९६३ या दिवशीच्या भाषणांत ते म्हणाले, "रशिया व चीन यांना जें शेतींत अपयश आलें त्यावरून आम्हांला धडा मिळाला. शेती व लघु उद्योग यांना त्वरित फळ मिळतें म्हणून त्याकडे आधी लक्ष पुरविलें पाहिजे. शेतीत बिघाड म्हणजे सर्वच बिघाड. तेव्हा भारताने जड उद्योगांच्या नादी न लागतां शेतीवर लक्ष केंद्रित केलें पाहिजे."
 वास्तविक एस्टिमेट कमिटी, इव्हॅल्युएशन कमिटी या लोकसभेने नेमलेल्या समित्यांनी १९५७, १९५९, १९६० या सालच्या अहवालांत, "शासकीय योजना आपल्यासाठी आहेत असें जनतेला वाटत नाही, त्या सद्य फलदायी नसल्यामुळे जनता त्यांत सहभागी होत नाही," हें महत्त्वाचें सत्य पुनः पुन्हा सांगितलें होतें. पण पंडितजींच्या मनावरची कम्युनिझमची मोहिनी दूर होण्यास सहा-सात वर्षे लागली. कारण रशिया, चीनकडून तोंपर्यंत धडा मिळाला नव्हता. ते देश शेतीचें महत्त्व गाऊं लागल्यावांचून पंडितजींनी तें कसें गावयाचें? ते देश म्हणजे पंडितजींची दैवतें. ते त्यांचे गुरु. त्यांच्या वाबतींत "वचनात् प्रवृत्तिः वचनात् निवृत्तिः।" हें पंडितजींचें ब्रीद. भारताची परिस्थिति पाहून, वस्तुस्थितीची दखल घेऊन, कांही धोरण आखणें त्या दृष्टीने अगदी निषिद्ध होय.
 मध्य-युगांतील शास्त्री-पंडित, भारताचें स्वातंत्र्य गेलें, अनेक आक्रमणें झाली, मुस्लिम, ख्रिश्चन सत्ता जुलूम करूं लागल्या, देश दरिद्री झाला, तरी वस्तुस्थिति पाहून स्वतः निर्णय करीत नसत. श्रुतिस्मृतिपुराणोक्त वचनांवरूनच निर्णय करावयाचा, असा त्यांचा दंडक होता. कम्युनिझमच्या बाबतींत पंडितजींची तीच वृत्ति होती. मार्क्स-लेनिन-स्टॅलिनोक्त वचनांवरूनच निर्णय करावयाचा. मग लोकसभेच्या समित्या कांही म्हणोत! भारताच्या शेतीचें व संरक्षणाचें कांहीहि होवो!

फसलेली परराष्ट्रनीति

 आपल्या परराष्ट्रीय राजकारणाचा जो विचका झाला आहे तो नेहरूंच्या व त्यांच्या वारसांच्या याच अंध, विवेकशून्य श्रद्धेमुळेच होय. आपलें धोरण अलिप्ततेचें होतें व आहे. पण त्यांत दर वेळी न्यायाधीशाची भूमिका भारताने घेतलेली आहे. अनेक राष्ट्रांना या शिष्टपणाची चीड आली होती. पण हंगेरीच्या बाबतींत रशियाविषयी जो पक्षपात पंडितजींनी केला, हंगेरीवर त्याने केलेल्या आक्रमणाचा वेळींच निषेध केला नाही, त्या वेळी भारताचा अलिप्तपणा ढोंगी आहे, हें सर्वांच्या निदर्शनास आलें. त्यामुळे अलिप्तपणाचें श्रेय तर गेलेंच आणि शिवाय दुसरी जबर हानि झाली