पान:इहवादी शासन.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४८ । इहवादी शासन
 

वादच नाही. पण त्यांची कृति पाहिली तर आपला भ्रमनिरास होतो. ते बुद्धिवादी होते, विज्ञाननिष्ठ होते, रूढ लोकभ्रमांतून मुक्त होते हें सर्व खरें आहे. पण कम्युनिस्ट तत्त्वज्ञान, कम्युनिस्ट पक्ष व स्वतःला कम्युनिस्ट म्हणविणारे देश यांचा प्रश्न उद्भवला की पंडितजींच्याइतका अंधश्रद्ध, इतका भ्रांत, इतका वास्तवशून्य माणूस दुसरा कोणी असेल असें वाटत नाही. आणि स्वतः पंडितजींनीच ही कबुली दिली आहे. २५ ऑक्टोबर १९६२ रोजी माहिती खात्याच्या मंत्र्यांच्या परिषदेत भाषण करतांना ते म्हणाले, "चीनच्या या सत्यहीन वृत्तीची आम्हांला जाणीव नव्हती म्हणून त्या बाबतींत आम्ही तेवढेसे जागरूक नव्हतों. आम्ही स्वतःच निर्मिलेल्या कृत्रिम जगांत राहत होतों. चीनने दिलेल्या या धक्क्याने आम्ही जागे झालों."

भोळीभाबडी श्रद्धा

 पण हें उशिरा जागे होणें भारताला अत्यंत महाग पडलें आहे आणि त्याचें कारण एकच, पंडितजींची कम्युनिझमवरील अंधश्रद्धा. कम्युनिस्ट राष्ट्रें साम्राज्यवादी असूच शकणार नाहीत, अशी त्यांची भोळीभाबडी श्रद्धा होती. १९४६ पासून पुढल्या पांच-सहा वर्षांत रशियाने मोठा साम्राज्यविस्तार केला होता. पोलंड, हंगेरी, रूमानिया आदि देश घशांत टाकले होते. तरी पंडितजींची भोळी श्रद्धा हादरली नाही. यामुळेच ते उत्तर सरहद्दीविषयी आणि एकंदर संरक्षणाविषयी गाफील राहिले. त्यांच्या शब्दांत म्हणजे "तेवढेसे जागरूक राहिले नाहीत."
 एवढेच नव्हे, तर कम्युनिस्ट चीनच्या सद्भावावर श्रद्धा ठेवून त्यांनी त्याला तिबेट-आक्रमणास संमति दिली. वास्तव जाणण्याची शक्ति हा इहवादाचा पाया आहे. ती शक्तीच पंडितजींच्या ठायीं नव्हती. त्यामुळे भारताची अतिशय हानि झाली आहे. चीनने दिलेल्या धक्क्याने आम्ही जागे झालों असें पंडितजी म्हणाले. पण ते जागे झाले असलेच, तर ते फक्त चीनच्या बाबतींत. कम्युनिझमच्या व कम्युनिस्ट देशांच्या बाबतीत नाही. १२ फेब्रुवारी १९६३ या दिवशी केलेल्या भाषणामध्ये ते म्हणाले, "मानवतेच्या शांततापूर्ण विकासाला चीनचा विरोध आहे. रशियाप्रमाणे त्याला सहजीवन नको आहे."
 पंडितजींच्या भोळ्या श्रद्धेमुळे संरक्षणाच्या दृष्टीने जशी हानि झाली तशीच नियोजनाच्या व उत्पादनाच्या बाबतींतहि झाली. कोणत्याहि देशाने उपलब्ध भांडवलाचा सर्वांत जास्त भाग प्रथम शेती विकासांत घातला पाहिजे. अवजड उद्योग हे नंतर पाहवयाचे, असा अर्थशास्त्राचा सिद्धान्त आहे. पण रशिया आपले भांडवल जड उद्योगांत गुंतवितो. तेव्हा भारताने त्याचेंच अनुकरण केलें पाहिजे हें उघड आहे. कारण तो कम्युनिस्ट देश आहे आणि कम्युनिस्टप्रेमी पंडितजी भारताचे महामंत्री होते. भारताला शेतीकडे दुर्लक्ष करून जड उद्योगांत आधी भांडवल गुंतविणें हें शक्य नाही, तें झेपण्याजोगें नाही. त्यामुळे जनता राष्ट्रीय उद्योगांत सहभागी होणार