पान:इहवादी शासन.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २४७
 

गौरव करीत आहे! कामातुर आणि सत्तातुर यांची जात एकच आहे असें दिसतें. या राष्ट्राचें हित, येथील जनतेचा उत्कर्ष, आपल्या स्वतःच्या प्रतिज्ञा, भारताची घटना यासंबंधी कसलीहि चिंता या देशांतल्या सत्ताधाऱ्यांना नसावी यापरता इहवादी तत्त्वांचा पराभव तो काय असतो ?

व्यक्ति-स्वातंत्र्याला विरोध

 भारतांतील कम्युनिस्ट पक्ष ही इहवादविरोधी शक्ति आहे असें त्या पक्षाच्या इतिहासांतून सांगून वर कांही उदाहरणें दिलीं आहेत. पण कम्युनिस्टांचा विचार करतांना आपण हें ध्यानांत ठेविलें पाहिजे की, कम्युनिझमचें मार्क्सप्रणीत तत्त्वज्ञानच मुळांत इहवादविरोधी आहे. लोकशाहींत व्यक्ति हे अंतिम स्वयंसिद्ध मूल्य मानतात. कार्ल मार्क्सला तेंच मान्य नाही. व्यक्ति ही कोठल्या तरी एका वर्गाचा घटक म्हणूनच मार्क्सवाद तिच्याकडे पाहतो. त्या तत्त्वज्ञानांत व्यक्ति हे साधन आहे, साध्य नाही. वर्ग हेंच सत्य, व्यक्तीचें स्वतंत्र अस्तित्व ही केवळ कविकल्पना होय, असें मार्क्सचें वचनच आहे आणि व्यक्तीची स्वतंत्र प्रज्ञा, तिची बुद्धिनिष्ठा, तिचें वेगळें व्यक्तित्व हा तर इहवादाचा आत्मा होय. सर्व भौतिक शास्त्रांचा विकास मानवाच्या या स्वतंत्र प्रज्ञेतूनच झाला आहे आणि आपला समाजवाद शास्त्रशुद्ध होय, विज्ञानपूत होय, आणि आपण इतिहासाची भौतिक मीमांसा केली आहे असें जरी मार्क्स म्हणत असला, तरी भौतिक शास्त्रांचें रहस्य जाणण्याची पात्रता त्याच्या बुद्धीला नव्हती. म्हणूनच त्याचें इतिहास- विवेचन भाकड, भाबड्या पुराणकथांपेक्षा फारसें निराळें झालेलें नाही.
 मॉस्को व पीकिंग नभोवाणीवरून स्टॅलिन व माओ यांचीं, "त्यांच्या कृपेनेच सूर्य उगवतो, फुलें फुलतात, ते सर्वसाक्षी सर्वज्ञ आहेत" अशीं स्तुतीस्त्रोतें गाइलीं जातात, हें पुराणवर्चस्वाचेंच द्योतक होय. हे तत्त्वज्ञान, ही वृत्ति व त्यांचा परिपोष करणारे पक्ष व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, इहवाद यांचे अत्यंत घातक शत्रु होत. भारतांतील कम्युनिस्ट पक्ष त्याच जातीचा आहे.

भारतांतील राजकीय पक्ष
१२


 कांग्रेस ही भारतांतील सर्वांत जास्त प्रबल अशी इहवादविरोधी शक्ति आहे. ती तशी नसती तर कम्युनिस्ट, मुस्लिम लीग या राष्ट्रघातक शक्तींचें कांही चाललें नसतें. त्या केव्हाच नामशेष होऊन भारताची अत्यंत द्रुतगतीने प्रगति झाली असती.
 पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतांतील इहवादाचे सर्वांत मोठे पुरस्कर्ते होते असे मानले जातें आणि त्यांची भाषणें व लेख पाहिले तर तसे ते दिसतात यांत