पान:इहवादी शासन.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । १३
 

समता, राष्ट्रवाद यांना धर्मपीठें सक्त विरोध करूं लागलीं, प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध होणाऱ्या गोष्टी अमान्य करूं लागलीं, त्यामुळेच इहवादाची चळवळ फोफावून अनेक देशांच्या शासनांनी रोमच्या धर्मपीठाचा संबंधच तोडून टाकला. याचा अर्थ असा की, धर्मसत्ता व राजसत्ता यांचे प्रांत विभक्त असणें एवढाच जरी इहवाद या शब्दाचा अर्थ असला, तरी त्याचा भावार्थ मोठा आहे. मानवाचा ऐहिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवहार हा तर्क, बुद्धिवाद, प्रत्यक्ष प्रयोगसिद्ध ज्ञान, इतिहासाने दिलेले पाठ यांच्या आधारें चालावा, तो पोथीनिष्ठा, अंधसिद्धान्त, ग्रंथप्रामाण्य यांच्या आधारें चालू नये, हा तो भावार्थ आहे आणि या दृष्टीने पाहतां रशियांत इहवाद आहे असें म्हणणें कठीण आहे. 'डायलेक्टिकल मटीरियालिझम'- विरोध- विकासवाद या मार्क्सप्रणीत तत्त्वावर सोव्हिएट नेत्यांची श्रद्धा जुन्या लोकांच्या बायबलवरील किंवा पोपवरील श्रद्धेपेक्षाहि जास्त अंध आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांतील विचारावर त्या तत्त्वज्ञानाचा अंमल चाललाच पाहिजे, असा त्यांचा पिसाट आग्रह आहे. त्यामुळे, युजीन कामेन्का याने म्हटल्याप्रमाणे, त्या तत्त्वज्ञानाला धार्मिक पंथाचें स्वरूप प्राप्त झाले आहे. कम्युनिझम हा एक धर्मपंथ असून, स्टॅलिन हा त्याचा पोप आहे असें हॅरोल्ड लास्की याने पंचवीस वर्षांपूर्वीच म्हटलें होतें. आजहि तत्त्ववेत्ते तसेंच म्हणत आहेत.

नव्या धर्माची स्थापना

 स्टॅलिन जिवंत असतांना, स्टॅलिन म्हणजे पृथ्वीचें तारुण्य, स्टॅलिन म्हणजे जगाचा वसंत ऋतु, सूर्य स्टॅलिनमुळेच प्रकाशतो, स्टॅलिन सर्वज्ञ, सर्वसाक्षी आहे अशी त्याचीं स्तुतिस्तोत्रे रचलीं जात होतीं व इजवेस्तियासारख्या पत्रांत तीं छापलीं जात होतीं. हंगेरींत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्टॅलिनचा फोटो लावण्याचा हुकूम निघाला होता. कशासाठी ? हंगेरियन कम्युनिस्ट पार्टीचा सेक्रेटरी म्हणाला, "त्याच्या दर्शनाने रोगी बरे होतील!" आज स्टॅलिन बदनाम झाला आहे. पण मार्क्स, लेनिन हे पुरुष त्याच्या जागी येऊन बसले आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द वेदवचनाप्रमाणे मानला जातो. त्यांच्या सिद्धान्तावर आक्षेप घेणें म्हणजे मृत्यूला बोलावणेंच ठरतें. त्यांच्या वचनांचा स्वतंत्रपणें अर्थ लावणें हेंहि सोव्हिएट शासनाला मंजूर नाही. बायबलचा अर्थ लावण्याचा अधिकार फक्त पोपलाच असे. त्याचप्रसाणे मार्क्ससादावर भाष्य करण्याचा अधिकार फक्त सोव्हिएट शासकीय नेत्यांनाच आहे. यावरून असें दिसेल की, धर्म या कल्पनेचें निर्दालन करतां करतां सोव्हिएट नेत्यांनी जुन्या धर्मापेक्षाहि जास्त अंध, दुराग्रही, हेकट, शब्दप्रामाण्यवादी, गूढ, तर्कातीत असा दुसरा एक धर्म निर्माण करून ठेवला आहे.
 सोव्हिएट शासन हें कितपत इहवादी आहे याचा निर्णय यावरून आपल्याला करतां येईल. इहवाद याचा बुद्धिवाद, विज्ञानवाद, प्रयोगनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य,